मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

 


The Great Indian Kitchen आणि आपण सगळे  

-सुलभा जाधव 


ग्रेट इंडियन किचन हा मल्याळम सिनेमा अमेझॉन प्राईम वर आलाय हे कळल्या बरोबर तो दीड तास मोकळा वेळ काढून बघितला.
आजपर्यंत बाईच्या पाचवीला पुजलेले स्वयंपाकघर इतक्या थेट कोणी मांडले नव्हते. यासाठी सर्वप्रथम तीन तासाच्या वर किचन मध्ये उभं राहिलं की शिसारी येणार्‍या समस्त स्त्रियांतर्फे मी दिग्दर्शक जो बेबी आणि निर्देशकना मनोमन साष्टांग दंडवत घातलाय !

समाजशास्त्रात "Reproduction of labour power"
अशी एक संकल्पना आहे.या संकल्पनेचा साधा सोपा अर्थ असा की काम करणाऱ्या व्यक्तीची दैनंदिन कार्यक्षमता टिकून ठेवणे.
ही कार्यक्षमता टिकून ठेवण्याची संपुर्ण जबाबदारी अलिखितपणे घरातल्या स्त्रीवर्गावर पडलेली आहे.
घरातून अर्थार्जन करायला बाहेर पडलेली व्यक्ती ही बहुतांशी वेळा पुरुषच असते. मागे राहून reproduction of labour power करणारी व्यक्ती ही स्त्रीच असते.(अपवाद क्वाचित) तिच्या या unpaid,unrecognised श्रमाची दखल कुठला सर्व्हे ,कुठली अर्थव्यवस्था तर सोडा  ज्यांच्या साठी ती रात्रंदिवस झटत असते ती घरातली आपली वाटणारी माणसं ही घेत नाहीत. त्या श्रमाची कुठे मोजदाद आढळत नाही.

सिनेमातली प्रत्येक फ्रेम ही या संकल्पनेवर अबोल भाष्य करते.

रोजचं जेवण,पंगती, जेवणावळी या कुठल्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. याचा सगळा भार हा भारतीय समाजरचनेत घरातल्या बाई वर येऊन पडलेला आहे त्याचे चौफेर आयाम या सिनेमात इतक्या सहतेने पण तितक्याच कौशल्याने चित्रीत केले आहेत.
सिनेमा सुरूच होतो तो तळणं, वाफवण, कापणं,कूकरच्या शिट्या,ताट वाढणं, सजवण, ते टेबलवर मांडणं याने.
सुरुवातीला फ्रेममध्ये नवीकोरी एक गाडी (मुलीला आदण म्हणून मिळालेली) ज्याच्यावर कॅमेरा बराच वेळ ठेवलाय हे रूपक!

तीने उठावं, शुचिर्भूत व्हावं आणि सरळ किचन गाठावं.
सकाळी उठल्यावर स्वतःलाच ते स्वच्छ प्रसन्न दिसावं म्हणून रात्री झोपण्यापूर्वी निगुतीने ते स्वच्छ करावं.
डोक्यात हाच विचार उद्या सकाळी काय करायचे?
सकाळचा नाश्ता संपला की दुपारच्या जेवणाला काय करावे?
दुपारचे जेवण संपले की रात्रीच्या जेवणाला काय करावे?
मग धुणी,भांडी, केर फरशी आहेच.
याच चक्रात तिचा दिवस सुरू होतो आणि संपतो.

त्यात स्वयंपाघरात निगडीत एकातेक गुंतलेली अनेक कामे. जसे की नाश्त्याला फक्त डोसा करायचा म्हणलं तरी त्यासाठी लागणारी पूर्वतयारी-नियोजन म्हणजे,आदल्या दिवशी दुपारीच डाळ तांदूळ भिजवणे ते सहा तासांनी रुबवणे रात्रभर ते आंबविण्यास ठेवणे.
त्या डोश्या सोबत लागणारे सांबर त्यासाठी लागणाऱ्या - भाज्या निवडणे- चिरणे, सोबत लागणाऱ्या चटणी साठी खोबरे खवून, एकीकडे तव्यावर डोसे घालने दुसरीकडे सांबर फोडणी टाकने तिसरीकडे ओल्या खोबऱ्याची चटणी करणे. हे सगळं धावत-पळत करणे जेणेकरून घरातल्या सगळ्यांना ते वेळेवर गरम गरम खायला मिळेल.
सगळ्यांना खाऊ घालून झाल्यानंतर शेवटी जेव्हा स्वतः जेवायला बसायची वेळ येते तेव्हा घरातल्या नव्या सुनेला टेबलावर पडलेल्या उष्ट्या-खरकट्या ताटांची, टेबलावर चघळून टाकलेल्या चोथ्याची किळस येते.घरात नवीन नवीन रुळू पाहणारी ही सून ते उष्ट खरकटे ताट बाजूला सारून  स्वतःसाठी जागा करते तर घरातली आई आहे त्याच नावर्याच्या उष्ट्या ताटात दोन करपे झरपे दोसे  घेऊन पोटात ढकलते हे चित्र अतिशय बोलके आहे.
जेवणं संपता संपता सिंक जवळ धुवायला पडलेला भांड्याचा पाळा वाट बघत असतोच!


नंदेच्या बाळंतपणासाठी सासू बाहेर गावी जाते जाताना बॅग भरून जे जिन्नस घेऊन जाते त्याचे रांधणे,सामानात आप्पे पात्र आणि सोऱ्या विसरता भरते म्हणजे जिथे ती चाललीय तिथे ही तिची चुलीपासून सुटका नाही हे दिसतंय.

कुटुंबियांच्या वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या भलत्या सवयी हा अजून एक विलक्षण प्रकार बायकांना सोसावा लागतोय.
यांच्या हातात टूथब्रश आणून देणे, यांच्या आंघोळी आगोदर बाथरूम मध्ये टॉवेल ठेवणे, यांनी चहा पिऊन झाला की आहे तिथे कप सोडून जाणे, यांना कूकर मध्ये शिजलेल्या भाताला चव लागत नाही तर मिक्सर मध्ये वाटलेली चटणी बेचव लागते, दुपारच्यावेळचे राहिलेले अन्न रात्रीच्या जेवणात चालवून घेणे टाकून देववत नाही म्हणून पुन्हा ते शेवटच्या पंगतीला बसणाऱ्या बाईने ते तिच्या पानात घ्यावे, वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या कपड्यांची यांना अलर्जी !
तर अवेळी आलेल्या आगंतुक  पाहुण्यांसाठी करावा लागणारा पाहुणचार, आदरतिथ्य, सरबराई ही घरातल्या बाई एकटीच जबाबदारी घरातले पुरुष आलेल्या पाहुण्यां सोबत गप्पा-टप्पा, माझा - मस्ती करायला मोकळे !!
घरात जेवणाच्या टेबलावर गलिच्छ बेदरकारपणे जेवणारा नवरा हॉटेल मध्ये जेवताना मात्र व्यवस्थित जेवतोय याची गमतीत घेतलेली नोंद यांचे इगो दुखावनार!!!

रोजच्यारोज आठवण करून देऊनही तुंबलेल्या सिंकच्या
दुरुस्तीला  प्राधान्य देणाऱ्याना या सगळ्यात घरातल्या बाईची नेमकी काय अवस्था होतेय त्याबाबतीत हे घरातून रोज बाहेर पडणारे सगळे अगदीच अनभिज्ञ..कसली ती दाखल नाही, जाणीव नाही की सहानुभूती नाही.

बायकांच्या मासिकपाळीच्यावेळी आणि व्रतं वैकल्यावेळीची
शास्त्र अजूनच गजब !

किचन ते डायनिंग टेबल एवढ्याच रिंगणात घिरट्या घालता घालता एकदिवस जेव्हा डान्स टीचर होण्याची इच्छा ती बोलून दाखवते तेव्हा तसे करण्यासाठी कुठलेच ठोस कारण देता तिला विरोध दर्शवताना घरातली पुरूष मंडळी गडबडतात.

ती प्रत्येक जेवणानंतर घरातल्या व्यक्तींनी टेबलावर टाकलेले खरकटे फडक्याने पुसत असते
आणि तितक्याच वेळेला  तुंबलेल्या सिंक मधे हात घालून
सिंक स्वच्छ करत असते हे बघायला किळसवाण तर वाटतच पण कंटाळा ही येतो.
सिनेमा मनाला भिडण्याचे कारण ही तेच आहे.
हा किचनमधला तोचतोचणा कंटाळवाणा आहे आणि तो अतिशय सोयीस्करित्या समाजव्यवस्थेने कुटुंबव्यवस्थेने स्त्रियांच्या माथी मारलेला आहे कधी मातृत्वाच्या नावाखाली कधी सहाचर्याच्या नावाखाली कधी प्रेमाच्या नावाखाली.

दिग्दर्शकाने असे अनेक कंगोरे अतिशय सटीकपणे टिपले असले तरी एखादे लहान मुल आजारपण दाखवले असते तर The Great Indian kitchen  अजूनच पूर्णत्वा कडे गेला असता.

तुंबलेल्या सिंक मधले गढूळपाणी ती चहाच्या कपात भरते आणि तुंबून टिपकणाऱ्या पाण्याची भरलेली बादली त्यांच्या आंगवर फेकून तडक माहेरीनिघून जाते.
माहेरी पोहचल्यावर संताप, क्रोध , तीटकार्याने भरलेल्या तिच्यावर आईच्या प्रश्नांची सरबत्तीसुरूच असते एवढ्यात तिचा बाहेरून आलेला भाऊ रोजच्या सवयीने आईकडे ग्लासभर पाणी मागतो.आई लहान बहिणीला भावाला पाणी द्यायला सांगते तेव्हा ज्या संतापाने ती लहान बहिणीला,” तू जगाची उठू नको” अशी तंबी देते भावाला तितक्याच तुच्छतेने जळफळाटाने “तुला हाताने घ्यायला येत नाही का ?” म्हणून टेबलावरचा ग्लास रागाने भिरकावून देते. हा प्रसंग घारोघरीच्या सत्य परिस्थितीचा आरसा आहे.
तिथेच सिनेमा मना सोबतच डोक्यातही खोलवर रुतून बसतो.
सिनेमात सुरवातीला दाखवलेल्या गाडीत बसून ती डान्स स्कूलला पोहचते खरी मात्र दुसऱ्या कोणीतरी किचन मधली तिची जागा पटकावलेली असते. किचन मधली ही श्रुखंला त्याच पुनरावृत्तीने चालू राहते.

स्वयंपाकघर खुद्द,निमिशा सजयान,सूरज वेंजारमूडू हीच मुख्यपात्र आहेत तर सहकलाकार टी सुरेश,अपर्णा शिवकामी यांचा अभिनय ही तितकाच सहसुलभ.
सिनेमाच्या शेवटी एक अर्थपूर्ण गाणं.

घरात खडाजंगी होणार या तयारीने घरातले मुलगे मंडळीना सोबत घेवून हा सिनेमा बघण्यात खरी मजा आहे!!!

महामारीची साखळी तोडायला लॉकडाऊनचा  मोठा पर्याय आपण आमालात आणतो आहोत. Indian Kitchen मधली ही पुरुषी मानसिकता, वर्तन, अहंकाराची साखळी तोडायला कुठलं आणि कसलं लॉकडाऊन आणावं लागेल ???

 -सुलभा जाधव 

 

२ टिप्पण्या: