Tuesday, December 15, 2009

सुगरण -३


सकाळी जिना उतरुन खाली आले तेव्हा अंगणात (फुटलेली दोन) अंडी पडलेली दिसली. दोन फुटलेली एक शाबूत..कावळा पहाटेच आपलं काम करून गेला होता वाटतं. त्याला अंडीच खायची होती तर या फुटलेल्या अंड्यांचा चट्टामट्टा का नाही केला त्याने? तो जिंवत पिलांच्या शोधात तर नाही? शाबूत अंडं मी अगदी काळजीपूर्वक पुन्हा खोप्यात ठेवलं.


आता मात्र मी ठरवलं, सुगरण सिरीयल पाहणं बंद करणं योग्य. कशासाठी मनाला चुटपुट लावून घ्यायची? आज फुटलेली अंडी बघायला मिळाली. उद्या काय वाढून ठेवलं असेल कोणास ठाऊक? दुपार पर्यत माझा निश्चय दृढ राहीला. त्यानंतर मात्र डळमळला. मन खोप्याकडे धाव घेऊ लागलं. मी बाल्कनीत येवून थांबले. जणू काही झालेलंच नाही अशा थाटात सगळं सुरळीत चालू होतं. कावळ्याचा काही मागमूस नव्हता. त्याला कळून चुकलं असावं याचा नाद सोडलेला बरा! सुगरणी त्यांच्या कामात गर्क. ज्यांच्या घरट्यांतून अंडी पडून फुटली ते सुगरणही (कदाचित) काहीच झालं नाही अशा भावात खोप्याची डागडुजी करत होते. वर वर बघता खोपे बांधून तयार होते. काही खोप्यांत पिल्लांनी जन्म घेतला असेल. म्हणून तर काही सुगरणी खोप्यांच्या नळकांड्यांतून फर्र्कन ये जा करताना दिसत होत्या. वरचे वर खोप्याची वीण घट्ट होत चालली आहे. पक्क्या विणीत पिल्लं अधिक सुरक्षित आहेत.कधी मी आळसावलेली असेन, उदास असेन, परिस्थितीपुढे हतबल असेन, निराशेचे मळभ मनात दाटलेले असेल, आता सगळं संपलं असं वाटेल, तेंव्हा ही सुगरण नक्कीच मला मदत करेल!खोप्यावर पाय रोवून अविरत एका काडीनंतर दुसरी काडी आणून त्याचा प्रत्येक टाका घट्ट सांधणाऱ्या या ज़सुगरणींशी नकळत माझे नाते जडते.


Saturday, December 12, 2009

सुगरण २

अगदी २-४ दिवसांत या सुगरणींची सोसायटी उभी राहिली...कदाचित प्रत्येक खोप्यात अंडीही असतील..आता हे सुगरण अंडी उबवतील त्यातून त्याची पिल्लं बाहेर येतील.. सुगरणी त्यांना दाण्यातला दाणा भरवतील..पिल्लं मोठी होतील त्यांना पंख फुट्तील..एकदा का पंख फुटले की पिल्लं या फांदीवरुन त्या फांदीवर झेपावत उंच आसमंतात भरारी घेतील...मी या विचारांतच हरवले होते की कावळ्याच्या काव-काव ने मला भानावर आणले. जणूकाही ही काव- काव माझ्या स्वप्नाळू मनाला जाणीव करुन देतेय सुरळीत घटना घडतील तो संसार कसला? अन काही उलथापालथ न होता प्रसववेदने शिवाय जन्म घेतो तो जीव कसा? काहीतरी निर्माण होतंय तेव्हा लगेचच त्याला नष्ट करु पाहणारं आव्हान त्याच्या समोर असलंच पाहिजे हा निसर्ग नियमच आहे का?


या खोप्याची चाहूल कवळ्याला लागली आहे तर. तो काव-काव करुन त्याचे भाऊबंद गोळा करतोय का या सुगरणींना आव्हान देतोय हे आता तरी माझ्या लक्षात येत नाही. कावळ्याच्या काव-काव ने भेदरुन घरट्यापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या फांद्यावरुन सुगरणींनीही चिवचिवाट चालू केला आहे. survival of the fittest च्या या भयाण नाट्यातला हा sound show मन हेलावणारा आहे.


अहोरात्र खपून बांधलेला खोपा हा कावळा ऐका फट्क्यात जमीनदोस्त करणार. मी ‘हुश्श,शुक-शुक’ करण्याच्या प्रयत्नात आहेच, पण कावळ्याला याचा काही फरक पडत नाही. तो खोप्यावर अगदी तुटून पडला आहे. इतका हुशार आहे हा शत्रू की खोप्याच्या ज्या खोलगट भागात अंडी असतात त्या भागावरच तो टोच्या मारून बोचकारतोय. कुठल्याही क्षणी खोप्याला भगदाड पडणार की संपलं सगळं - मी स्वतःला सांगून टाकलं. सगळ्या ताकदीनिशी कावळा खोप्याला झटतो आहे. काय शिल्लक राहणार आता हा खोपा. मात्र माझा हा विचार चुकीचा ठरला. एवढ्या झटापटी नंतरही सुगरणीचा हा खोपा तग धरून आहे. आश्चर्य म्हणजे खोप्याच्या विणकामावर याचा काही परिणामच नाही. विंचरलेले केस जसे वाऱ्यावर विसकटतात,एक कंगवा - की लगेच पूर्ववत नीटनेटकं डोकं व्हावं तशीच काहीशी या घरट्याची अवस्था झालीय. कावळा मैदान सोडून पळाला आहे आणि सुगरण पुन्हा कंगवा फिरवण्यात – आपलं- डागडुजी करण्यात मग्न!
काड्या काड्या गोळा करुन उभं राहणाऱ्या या संसारात चांगलाच climax आला आहे. संसार चिऊ-काऊचा असो वा माणसांचा; चटके हे ठरलेले आहेत, नाही? आवळ्यावरच्या घरट्यावर हल्ला करून काही मिळालं नाही हे बघून कावळ्यानं समोरच्या नारळावर लटकणाऱ्या खोप्यावर हल्लाबोल केलेला दिसतोय. गवताच्या एका एका काडीने मोठ्या कौशल्याने विणलेला हा खोपा बघण्यात नाविन्याचा, सृजनतेचा जो आनंद मला मिळत होता त्याची जागा आता भीति, असुरक्षितता, उदासपण यांनी घेतलीय...इथं तर कावळा चोचीत खोपा ज्या फांदीत गुंफला आहे तो शेंडाच चोचीत पकडून ३६० अंशात फिरवून उचकटण्याच्या प्रयत्नात आहे. आता मात्र हे बघवत नाही. प्रकरण हाताबाहेर जाण्याअगोदर काहीतरी केलं पाहिजे. मी जळमटं काढण्याचा झाडूच हातात घेऊन उभी आहे. आता येऊच त्या कावळ्याला, बघते त्याला! आला रे आला की चांगला झाडतेच त्याला. पण विचार योग्य असला तरी अवघड आहे. मी इथं चोवीस तास काही पहारा नाही देऊ शकत. आता या सुगरणी आणि त्यांचं नशीब.


काय केलं म्हणजे या कावळ्यापासून खोपा वाचेल? माझा विचार चालूच आहे तोवर पुन्हा ती अगदी नकोशी कर्कश्श काव काव आणि चिवचिवाट कानावर पडला. कावळ्याला हुसकावू म्हणून बाहेर आले आणि पाहते तर काय – माझ्यासारख्याच २-३ बाल्कनी प्रेक्षक मैत्रीणी त्या कावळ्याला हुसकावत आहेत. चला सुगरणींकडे बरीच सहानुभूती आहे म्हणायची!प्रपंचाच्या या लढाईत काय काय होणार आहे...कुठलं दर्शन ही ‘सुगरण संसार’ मालिका मला देणार आहे...

(फोटो इंटरनेटवरून)

Thursday, November 5, 2009

सुगरण - १


जरा उसंत मिळाली की नकळत पावलं बाल्कनीत वळतात. आत्ताही असंच झालं. बाल्कनीत उभं राहून इकडं तिकडं बघत रहायला भारी मज्जा येते. आत्ता इथं उभी आहे तेव्हा लक्षात आलं आज सकाळ पासूनच काही नवीन पाहुण्या माझ्या मागच्या आणि पुढच्या बागेत किलबिलाट करत आहेत...त्याच्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळाला नाही. आत्ता जरा लक्ष देऊन याच्यांकडे पाहतेय तेव्हा कळतंय या तर सुगरणी आहेत आणि या बया (baya!) अतिशय व्यस्त आहेत. त्यांचं घर बांधणं चालू आहे ना! चला पुढचा एक महीना मला यांचा ‘काडी काडी गोळा करुन केलेला संसार’नाही पण संसारासाठी जमा केलेल्या काड्या तरी बघायला मिळणार!

मला काही यांच्या नर मादीतला फरक करता येणार नाही; एवढं सांगू शकते की हे पाहुणे १०-१२ आहेत. म्हणजे ५-६ जोडपी. यांच्यांपैकी एका जोडप्याला घरासाठी ‘साईट’ पसंत पडलीय वाटतं. बाकी कुटुंबं "डिसकशन" करतायत. वरच्या पट्टीतली चिवचिव करत आहेत त्या "सुगरणी". आणि गप्प बसून ऐकणारे (ऐकण्याचं नाटक करणारे) "सुगरण". आपण निवडलेली जागा दुसरं कोणीतरी पटकावेल म्हणून की काय एका सुगरणीला भलतीच घाई दिसतीय. केवढ्या घाईघाईने ती नारळाच्या बुंध्यातून एक लांबच लांब दोरी काढतीय. काढलेली दोरी चोचीतच मागे सरकवून दुसरी-तिसरी अशा एकामागून एक दोऱ्या ती काढतीय. एवढं करून ती उडून जातेय आणि दोन-तीन मिनिटांत परत येऊन पुन्हा आपलं काम चालू ठेवतेय...कुठं असेल बरं तिची ‘साईट’?

संध्याकाळच्या काही कामासाठी मी किचन मध्ये आलेय आणि खिडकीतून मला काय दिसतंय माहितीय -आवळ्याच्या डहाळीवर सुगरणीच्या घराचे बीम-कॉलम उभे आहेत! अरे व्वा मला साइट सापडली म्हणायचं. समोरच्या नारळावरून मालवाहतूक मागच्या आवळ्यापर्यंत होतेय तर. खरचं मला या सुगरणींचा काडी काडी गोळा करुन केलेला संसार बघायला मिळणार आहे.

अजून थोडावेळ झोपावं असं रोजच उठताना वाटत असतं. अजून ५ मिनिटं म्हणत म्हणत पुढचा कितीतरी वेळ अंथरुणातच जातो. ‘मस्त चहा पिऊया’ असं आमिष स्वतःला देऊन किचनकडे जायचं..आज किचन मध्ये गेल्यानंतर इतकं भारी surprize मिळेल असं वाटलं नव्हतं. अहो, आवळ्याच्या फांदीवर सुगरणींची कॉलनीच तयार झालीय! अरे मी झोपेत असे पर्यंत इथं २-३ संसार उभे राहीले...माझा आळस कुठ्ल्याकुठे पळून गेला, एकदम तरतरीत वाटू लागलं. बापरे ग्रेटच आहेत या सुगरणी. मला वाटलं होतं महिनाभर तरी ही सिरीयल ‘बाल्कनी चॅनेल’ वर बघायला मिळणार. इथंतर महाएपिसोड without break चालू आहे...


Tuesday, November 3, 2009

विरह


मन खिन्न असतं

स्वत:शीच म्हणतं,

बघ, हे नव्हतंस ना अनुभवलंस?

हे बघ, याला म्हणतात

विरह...

एखाद्या कवितेत,कथेत वाचलेला

चित्रपटात दिसलेला

हाच तो विरह

त्यावेळी वाटायचं

हा विरह कित्ती छान अभिव्यक्ति आहे.

का बरं असं वाटायचं?

ज्यावेळी त्याची अनुभूती येते

तेव्हा मात्र हे असह्य असतं...

सगळं निर्जीव वाटू लागतं,हिरवळ सुकलेली वाटते

उदास, बेचैन असं बरंच काही..

पटतं, की जे सौंदर्य तेव्हा अनुभवलं ते या मनानंच निर्मिलं होतं

आणि ही विरूपता ही त्याचीच निर्मिती..

हे काय चाललंय?

असंच नक्की वाटतं का?

हे असंच वाटतं असंही नाही म्हणता येत,

पण असंच काहीतरी.. आशय तोच.

संध्याकाळी खिन्न असताना

वाऱ्याबरोबर वाहत येतात काही अनोळखी सूर

तेही विरहच आळवत असतात

पण ते ऐकून खिन्नता कुठल्याकुठे पळून जाते

कारण कोंडलेल्या भावनेला वाचा फुटलेली असते...Sunday, November 1, 2009

स्टाइल!खादीचा झब्बा आणि पायजमा घातलेला माणूस पाहिला की आपण अंदाज बांधतो की हा कुठल्यातरी एन जी ओ चा, चळवळीचा कार्यकर्ता किंवा पत्रकार असावा. सुटाबुटातला तो किंवा ती म्हणजे “कार्पोरेट”. कॉटनची साडी, त्यातही बांधणी, बाटीक, पटोला, संबलपुरी आणि गळ्यात, हातात, कानात दगड, लाकूड, शंख-शिंपले, टेराकोटा इ. चे डाग असा पेहेराव असणारी महिला पाहिली तर नक्की समजावे ‘फेमिनिस्ट’, ‘ऍकॅडेमिशियन’, किंवा फ़ाईन आर्ट्स. स्टार्च केलेले पांढरे शुभ्र कड्क कपडे म्हणजे आपले नेते.

काही व्यक्तींचा पेहेराव आणि ते इतके एकजीव झालेले असतात की त्यांच्या नावानेच ती स्टाईल आकार घेते. त्यात काही बदल झाला तर बघणाऱ्यांनाच चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहते. सोनिया गांधी म्हटलं की कॉटन साडी. प्रतिभा पाटील म्हणजे सिल्कच्या काठापदराच्या मोतिया रंगाच्या साड्या. बच्चन म्हणजे सूट. किरण बेदी म्हणजे जाकीटवाला पठाणी ड्रेस. वृंदा करात, अरुणा रॉय, सुषमा स्वराज या मोठ्या लाल टिकलीशिवाय कशा दिसतील? प्रकाश आमटेंनी फुल पॅंट आणि शर्ट घातला तर कदाचित तेच स्वत:ला आरशात ओळखू शकणार नाहीत.

अलीकडे मी बऱ्याच सार्वजनीक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. आज काय नेसावं, काय घालावं या नेहमीच्या प्रश्नाची भुणभुण काही लवकर पिच्छा सोड्त नाही. प्रसंगानुसार पेहेराव असावा असे शिकवणारे बरेच लेख ‘सखी’, ‘मधुरा’, ‘मुक्तांगण’ इ. मध्ये सारखे येत असतात. महिलावर्गाचा हा खास जिव्हाळ्याचा विषय: कारण त्यांना यात विविधता आणायला भरपूर स्कोप असतो. प्रसंगानुरूप आपण काय घालतो यावरून आपली टेस्ट, आपला सेन्स, आपली पर्सनॅलिटी दिसते, आपण केलेलं ते अनवर्बल स्टॆट्मेंट असत इ. असं म्हणतात.. थोडक्यात कपडे बघून आपली ‘पोथी’ वाचली जाते. लग्न, बारसे, डोहाळजेवण, एकसष्ठी इथं पैठण्या, कांजीवरम, पोचमपल्ली, मणीपुरी सिल्क, आणि पारंपारिक ड्रेसेस बघायला मिळतात.रात्रीच्या उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या डीझाइन कपड्याना खास महत्त्व असते. ह्युमॅनिटिज च्या सेमिनार्स मध्ये कॉटनच्या वेगवेगळ्या प्रकारांचा सडा पडतो. झेंडावंदना दिवशी फ़िकट रंगाचे कपडे बाहेर निघतात.

कपड्यांचे कलेक्शन हे सुद्धा एक मोठं प्रकरण आहे. माझ्या एक शिक्षिका सहा महिने एकही साडी रिपीट करत नव्हत्या. एका हौशी मैत्रीणीकडे साडीच्या प्लेन रंगाच्याच चौतीस छ्टा आहेत. काहीजणांकडे विंटर, समर, ट्रॅडिशनल, वेस्टर्न, कॅज्युअल वेअर, ब्रॅण्डेड असं भरमसाट कलेक्शन असतं. (एखादा सीजनल सेल यांच्या घरी सहज लवता येइल!) असो.

आपल्या कपड्यावरून जर लोक आपली उंची-खोली मोजत असतील तर आपणही आपली (खिशाला परवडेल अशी) स्टाईल ठरवावी असं वाटतं खरं. अशा वेळी गांधीजी मात्र आपसूकपणे डोळयांसमोर येतात. सोप्पं काम होतं ना या माणसाचं! पण या सोप्या कामामागे कन्व्हिक्शन केवढं भक्क्म होतं! माझ्या “त्या” स्टाईलचं कन्व्हिक्शन ही तसंच भक्कम असावं...


Saturday, October 31, 2009

मनसुबा"मदर" च्या बारा शक्ती, प्रत्येक शक्ती तुझ्यासाठी
वर्षानंतरचं बर्ष
महिन्यानंतरचा महिना
दिवसानंतरचा दिवस
बरीच स्वप्नं...बरेच मनसुबे! त्यातला महत्त्वाचा आणि पहिला
शहाण्या बाळासारखं तू म्हणशील ते ऐकायचं
खूप वाटतंय तू सोबत असावंस, तुझ्यासोबत असावं
पण...मंजूरे खुदा!
आज कुठेही असलास तरी तुझ्यातच
यापुढे कुठेही असलास तरी तुझ्यातच