गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

 कैरी मोहत्सव-१ 

म्हणजे असं आहे की शेजारी एक घर रिकामं आहे.

तिथे एक भलमोठा आंब्याचं झाड आहे त्याला अशक्य हिरव्याकंच कैऱ्या लटकत आहेत.

घरातून बाहेर पडून रस्त्याला लागेपर्यंत कितीही मान वळवून दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी त्या काही नजरेआड होत नाहीत.

त्यांना बघून तोंडाला पाणी सुटतं ते घटाघटा गिळाव तर लागतं वरतून त्या  कैरीचं काय काय करता येईल याची विचारचक्र चालू राहतात. झाड जरासं मागे पडलं की विचारही मागे पडतात पण ते तेवढ्यापुरतेच कारण घरी परत येताना पुन्हा झाड डोळ्यासमोर आणि पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर.

तेरे चेहरे से नजर नही हटती नजारे हम क्या देखे टाईप्स !

बरं,

शेवटी आज दहा-पंधरा कैऱ्या तिथल्या तोडून आणल्या तोडून कसल्या चोरूनच. 

पण चोरून तरी कसं म्हणणार ओ ??? कारण कुणाला विचारून आणायच्या सध्या ते घर रिकामच आहे. 


सगळ्यात मोठ्या- मोठ्या चार कैऱ्या घेतल्या एकदा प्रेमाने त्यांना गोंजारले आणि पदर खोचून पुढच्या कामाला एक मिनिट हि न दडवता सुरुवात केली. 

कडक उन्हाळ्यात दुपारी दीड दोनच्या सुमारास किचन मध्ये उभा राहून टंगळमंगळ करायला ते काही थंड हवेचे ठिकाण काश्मीर, शिमला, उटी मनाली नक्कीच नाही ना !

मग काय दहाव्या मिनिटाला इथून बाहेर पडायचे हे ठरवूनच त्या कैऱ्या नळाखाली खळाखळा धुतल्या, खसाखसा पुसल्या, बोटाच्या पेरा ईतका आकार धरून भसाभसा चिरल्या.


चहाच्या चमचा ने एक चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा हिंग, हे एक लाडकं प्रकरण आहे. डबी उघडली की अगोदर ती नाकापुठे न्यायची, जुन्या बायका नाकपुडीतून  तपकिर ओडायच्या तसा आपण फक्त उर भरून वास घ्यायचा. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद,लिंबाएवढा गुळाचा खडा, फोडणीसाठी पाच-सहा चमचे तेल हे जिन्नस पटापटा गोळा केले. 




झटकन ट्रोलीतून कडल बाहेर काढलं.

या कडल्या ची गोष्ट लगे हात सांगूनच टाकते.हा याचा तिसरा जन्म. 

तो असा, मला लोखंडी कडल घ्यायचं होतं ते काही केल्या मला मिळत नव्हतं. इकडे ओरिसात लहान मोठ्या यात्रा असतात-  यात्रेत छोटी-छोटी दुकान थाटलेली असतात. संसारात लागणाऱ्या जवळजवळ सगळ्या लहान सहान गोष्टी तिथे मिळतात. मात्र मला पाहिजेअसं लोखंडी कडल काही कुठे मिळत नव्हतं. अशाच एका यात्रेतल्या दुकानात मला लोखंडी पळी दिसली. त्या पळीचा दांडा हातभर लांब होता. ही पळीच आपण कडल्यासारखी वापरू असा विचार करून मी ती सात वर्षांपूर्वी तीस रुपयांना खरेदी केली. तिचा तो हातभर दांडा डोळ्यांना फारच डाचत होता. एकदा घरात काहीतरी बांधकामासाठी मोठा हातोडा खरंतर घन घेऊन मिस्त्री आलेले होते त्या मिस्त्री कडून तो दांडा मी अर्धा तोडून घेतला. असा तिचा दुसरा जन्म. पुढे अर्ध्या तुटक्या दांड्याची ती पळी गॅसच्या बर्नरवर कधीच नीट बसली नाही. पण सांगायचे कुणाला आपलीच अक्कल !

प्रत्येक वेळी फोडणी करताना तिची डुग डुग सांभाळण्यात अर्धा जीव आणि आर्धा त्यात कडलेल्या तेलात एकानंतर एक जिन्नस टाकण्यात. पूर्ण  मन लावून फोडणीवर लक्ष कधीच देताच येत नव्हते. त्यावर इलाज म्हणून तो दांडा पुन्हा एल सारखा वाकून घ्यावा असा विचार मनात आला व तो अशाच एका संधीचे सोन करून घेण्याच्या बेतात वाकवून घ्यायला गेले तो त्याचा दांडा च मोडला. आता बसा.

घरी एकदा वेल्डिंग मशीन आली होती तेव्हा त्याला मी वेल्ड करून घेतले असा त्याचा तिसरा जन्म.

इतके पुनर्जन्म झाल्यानंतर पुढे किती ही सुबक कडली आली तरी हे कडलं काही मला बदलू वाटणार नाही की कुणाला देऊ वाटणार नाही. तसा जीवच जडलाय त्याच्यावर आणि माझा संसार कडेला जाईपर्यंत मी काही हे बदलेल असं वाटत नाही.

तर मूळ मुद्द्यावर 

तापलेल्या कढल्यात अगोदर मोहरी भाजून घेतली नंतर मेथी भाजून घेतली. अगोदर मोहरी भरड पूड करून बाजूला ठेवली  नंतर मेथीची भरड पूड केली. कढल्यात तेल ओतलं तेल कडक तपल्यानंतर गॅस बंद केला. त्यात अगोदर मोहरीची पूड व नंतर मेथीची पूड घातली. पूड जेवढी झाली होती ती सगळीच्या सगळी नाही टाकली ती जरा जास्त होतीय असं वाटलं तुम्ही पण तुमचा ऐनवेळेचा अंदाज नक्की घ्या. त्यानंतर हिंग,लाल तिखट आणि हळद हे एकामागून एक घातले. ही सगळी चरचरीत फोडणी कैरीच्या फोडींवर ओतली (तेव्हा एका हाताने व्हिडिओ करत होते.)



हे जे डोळ्यासमोर एका बाऊलमध्ये दिसत होतं त्यात तो लिंबाएवढा गूळ चिरून पसरला आणि या गोड प्रकरणाला(कुंड्याला) एखाद्या गोडूल्या बाळासारखे दोन्ही हातात धरुन पाखडल्या सारखे झेलत होते.

इति फायनल प्रॉडक्ट चा फोटो काढायचा राहून गेला मात्र   हे सगळं घुसळलेली एक कैरीची फोड देवाला द्यायला आठवणीने बाजूला काढून ठेवलीय कारण कैऱ्या न विचारता न आणल्या होत्या ना . लहानपणी असं काही चुकीचं केलं की एक घास देवाला देऊन खाण्याची  आमच्यात बोत होती !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा