रविवार, १८ एप्रिल, २०२१

वाटीभर भडंग

#आजचा बेत -२

भडंग ची रेसिपी टाकायची म्हणजे हा शुद्ध आगाऊपणा ! भडंग करण्यात काहीही नावीन्य नाही. म्हणजे बायकांना अर्ध्या रात्री उठून भडंग कर म्हणलं तरी त्या डोळे झाकून करतील! अगदी बे चा पाढा म्हणण्यासारखी याच्यासाठ ही सरावाची गोष्ट आहे. भडंग साठी लागणारा ज्याला आमच्या उस्मानाबादकडे चुरमुरा,पुण्याकडे कुरमुरा, इतर महाराष्ट्रातला मुरमुरा म्हणतात. हा पोकळ नसून भरीव असतो, पृथ्वी तलावर फक्त तो सातारा,सांगली,कोल्हापूर इथेच मिळतो. पुण्यात जशी बाकरवडी तशी या तीन जिल्ह्यांमध्ये भडंग. मी उस्मानाबादची आणि उस्मानाबाद मध्ये आम्हाला या भडंगच फार अप्रूप. वडील शिक्षकी पेशातले, कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत, सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांची सगळी सेवा ही तुळजापूर आणि उस्मानाबाद येथेच झाली. बालपणीच्या काही गोष्टी आपल्या मनात अश्या कोरलेल्या असतात की त्याचा कधी विसर पडत नाही त्यातलीच ही भडंग. वडील कोल्हापूरला त्यांच्या संस्थेत कुठल्या मिटींगला गेले की येताना ज्योतिबाचा गुलाल, दवणा आणि पोतभर भडंग घेऊन यायचे. पुढे काय...मी कोल्हापूरची सूनच झाले ! मग मग काय दूधो न्हाओ भडंग से !!! मला एक पितळेच भलं मोठं पातेलं सासूबाईनं कडून खास भडंग हलवण्यासाठी मिळालय ! फोटोत दिसेलच. (त्याच्या कळकटलेपणावर जावू नका कारण बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे मागचे वर्षभर कोरोणाच्या कृपेनुळे झालेलेच नाही😝) ही भडंग माझ्या अशी मदतीला धावून येते की तीची किंमत मीच जाणो. बाजीप्रभूंनी जशी दोन्ही हातात तलवार घेऊन पावन खिंड लढवली तश्या मी वाटीभर भडंगच्या जोरावर अनेक खिंडी लढवलेल्या आहेत. अचानक घरी टपकले पाहुणे, वेळी-अवेळी लागणारी भूक, काहीतरी खमंग चटपटीत खायचय, आता काय खाऊ या सगळ्यावर एकच उत्तर- वाटीभर भडंग !!! भडंग चे टिपिकल चुरमुरे आणि लसुन,कढीपत्ता,हिंग आणि शेंगदाणे यात लपलेला त्याचा प्राण ! याशिवाय त्याला भडंग म्हणणं हे पापच. इथे ओरिसात मला भडंग साठी लागणारे टिपिकल चुरमुरे मिळत नाहीत. काही गोष्टी मिळतच नाहीत त्यात माझी मुलं यातले शेंगदाणे खात नाहीत म्हणून मी या शेंगदाण्याना फाटा दिलाय मग मजबूरी का नाम... म्हणत मी जे काय करते त्यालाच भडंग म्हणतेय. उडिया भाषेत चूरमुऱ्याना मुडी म्हणतात. दारावर भाजी विकायला यावी तशी इकडे गावोगावी, शहरोशहरी मुडीचे पोते सायकलला बांधून मुडीवाला दारावर मुडी विकायला येतो. ठराविक रुपयांना ठराविक आकाराच्या डब्याचे माप अशी ती मोजून मिळते.आज सकाळी मी चाळीस रुपयाची मुडी विकत घेतलेलीय आणि या वाटीभर मुडीचा घाट घातलाय. 👉साधारण दोन ते तीन गड्डे सोललेला लसूण 👉भरपूर हिरवागार ताजा-ताजा(हे ऑप्शनल आहे) कढीपत्ता 👉चिरुन उन्हात वाळवलेला कांदा ( तो मी करून ठेवलेला होता.) 👉जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट,मीठ आणि पिठीसाखर

👉कढईत अंदाजे वाटीभर तेल गरम करायचे त्यात अगोदर सोललेला लसुन ओबडधोबड चेचून घेवून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तळून घेतलेला हा लसून चुरमुरयावर एका बाजूला ओतून ठेवायचा. 👉त्याच तेलात कढीपत्ता तळून घ्यायचा. गरम तेलात कढीपत्ता टाकल्याबरोबर तेल उडते तेव्हा एका हातात कढीपत्ता आणि दुसऱ्या हातात एक ताटली घ्यायचीच. कडीपत्ता टाकला रे टाकला की दुसऱ्या हातातली ताटली त्या कढईवर धरायची जेणेकरून तेलाचा भपकारा सगळ्या घरभर उडणार नाही. 👉कढीपत्ता तळून घेतल्या नंतर तेलाचा ताव बर्‍यापैकी कमी झालेला असतो, त्याच आचेवर वाळवलेला कांदा तळून घ्यायचा.तो काळा होणार नाही याची पुरती काळजी घ्यायची. 👉हे तिन्ही जीन्नस चुरमुर्यावर वेगवेगळ्या बाजूला ओतून ठेवायची. 👉 त्यानंतर गॅस बंद करून गरम तेलात एकानंतर एक जिरे, मोहरी,हिंग, हळद आणि अजून एकदोन मिनिटांनी लाल तिखट घालायचे. 👉ही फोडणी अशीच बाजूला ठेवून, दुसऱ्या बाजूला जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही यासाठी एक कॅरीबॅग हातात घालून चुरमुरयावर ओतलेले कढीपत्ता लसून कांदा याचे ढीग कुस्करून घ्यायचे. 👉आता कढईतील तेलाची फोडणी या चुर्मुर्यावर टाकून हे सगळं चांगलं घोळून घ्यायचं.





👉शेवटी मीठ आणि पिठीसाखर पेरून हे सगळं प्रकरण एक लिंबू बाई दोन लिंबू या ठेक्यावर पखडल्यासारखं झेलत राहायचं.
तळलेला कढीपत्ता, लसुन, कांदा, हिंग याचा जो दरवळ घरभर पसरलेला असतो त्यावरून सगळ्यांना अंदाज येतोच की ही बाई तिची वाटीभर भडंग घेऊन पुढचे काही दिवस खिंड लढवायला तयार झालेली आहे !
-सुलभा जाधव 

1 टिप्पणी:

  1. Jay Jagannath
    Dear Friends
    A *National Level Web-Seminar* will be organized on *04.03.2023* and an *ISBN recognized book* will be published under the joint patronage of *Jeypore Sahitya Paribara* and *Sunabeda Women's Degree College, Odisha.* You can get information about the registration and program through the link below. The main theme is *Development Challenges in Scheduled Areas.* One can see the sub-themes in the Brochure Link below :-

    *Brochure Link : https://drive.google.com/file/d/1JyFnuOtJJdy24bbn9VeAI7lC9jnUrpk9/view?usp=drivesdk

    *Registration Link (Google Form ) : https://forms.gle/Wt3bCrPSje79kApbA
    🙏

    उत्तर द्याहटवा