सोमवार, १९ एप्रिल, २०२१

 #आजचाबेत-३

तुम्हाला "बंटी और बबली" आठवतो का?
आठवत असेल तर त्यातला शेवटचा बबलीचा (राणी मुखर्जी) डायलॉग आठवतो का जिथे ती दशरथ सिंगच्या (अमिताभ बच्चन) च्या समोर राकेशला (अभिषेक बच्चन) म्हणते,
"मैने, मैने एक और मर्तबा आम का अचार बनाया तो मैं मर जाऊंगी | मैं मर जाऊंगी राकेश |"
त्या बबलीने चांगुलपणाच्या घरेलू बुरख्याला उबून अगदी रडकुंडीला येऊन तिने मारलेला हा डायलॉग मी इतक्या प्रेमाने झेलला होता कि आज ही तो माझा वन ऑफ द फेवरेट आहे.
मला तो इतका आवडला होता की मी पोट धरून हसले होते कारण बंटी च्या जागी मला मीच दिसत होते.
एकूणच किचन मधला सुग्रावा हा ऑप्शनल असायला पाहिजे. तो कंपल्सरी/अनिवार्य झाला कि आपली बबली होते वा बबली मध्ये आपण स्वतःच दिसायला लागतो.
सांगायचे तात्पर्य सध्याचा कैरी महोत्सव हा पूर्णपणे ऐच्छिक सिलॅबस आहे.
जेव्हा तुमची मैत्रिण सुनीला तिच्या दारातल्या भल्यामोठया डेरेदार आंब्याची एकएक कैरी मोठ्या शिताफीने तोडून तुमच्या घरी वाणवळा पोच करते तेव्हा हा सिलॅबस तुमचा फेवरेट सब्जेक्ट झाल्याशिवाय राहील का?
हे सगळं करण्यात आणि खिलावण्यात मिटक्या मारणारा आंबट-गोड आनंद ही आहेच.
आजचा छुंदा मैत्रिण प्रणालीच्या आई ची पाककृती आहे.
पुण्यातून कोणार्क एक्स्प्रेस ने भुवनेश्वर गाठावे लागायचे तेव्हां ३० ते ३२ तास रेल्वेत जायचे. बहुतेक वेळा प्रणालीच्या आईने डबा दिलाय आणि त्यात हा छूंदा असायचाच.
जेवायला अनिच्छ असणार्या ५-६ वर्षाच्या राऊचा सगळा प्रवास त्या छुंद्यावर तारून जायचा.
या छुंद्याच्या निमीत्ताने तो जवतोय हे माझ्यातल्या आई ने लगेच हेरले व ही रेसिपी शिकून घेतली.

मागच्या १०-११ वर्षांत उन्हाळ्यात कैरीचे काही करणे होवो अथवा न होवो पण एक काचेची बरणी एमाने ईतबारे छुंदा तिच्यात मोठया हौसेने सामावून घेऊन ८-१० दिवस कडक उन्हात उभी असते.
लहानग्या राऊला आत्ता मिसरूड फुटायला लागलीत त्याच्या अनेक आवडी निवडी बदलल्या पण छुंदा प्रेम अबादित आहे.
करायला अगदी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यासाठी “नवनीत चे 21 अपेक्षित” आहे.

मी ७ कैऱ्या धुवून पुसून सोलून घेतल्या. सोलूनच घ्यायच्या तर धूत पुसत कशाला बसायचे?
पण तसं नाही. ते करायलाच लागतं. कारण, हं बरोबर बोलतात द्या टाळी- शास्त्र असतं ते !
सोलून पडलेली सालं मुकाटयाने. गोळा करून एखाद्या रोपाच्या बुडाला पुरायची किंवा कंपोस्टच्या कुडींत रवाणगी करायची.
सोलून घेतलेल्या कैऱ्या किसून घ्यायच्या. किसलेल्या कैऱ्या वाटीने किंवा कुंड्याने मोजून घ्यायच्या.
ती किसलेली कैरी चाखून बघायची. खूप आंबट असेल तर पडलेल्या खिसा च्या अर्धी साखर घ्यायची - १:१/२


कैरीचा कीस गोड असेल तर अर्ध्यापेक्षा थोडी कमी साखर घ्यायची-१:१/३

तुम्हाला तिखट कसं आवडतं त्या अंदाजाने तिखट घ्या मी इथं पावूण वाटी तिखट घेतलेय.
मीठ, मीठ मी पाऊण वाटी घेतलेय.
हे सगळं मिसळून घ्यायचं स्वच्छ निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरायचं (प्लास्टिक ही चालेल) ही बरणी तलम सुती कापड तोंडाला बांधून किंवा दुधाची जाळी झाकून पुढचे आठ-दहा दिवस कडक उन्हात रोज पाच-सहा तास ठेवायची.

कैरीचा वाणवळा दिलेल्या मैत्रिणीला चवीला म्हणून हात आकडता घेत बरणी अर्धीच भरायची. आवडले तर पुन्हा देईन असं म्हणत आपल्या कद्रू मनावर आपणच पांघरून घालायचे. वरून वार्यावावदळात कैर्या पडल्यातर पुन्हा कैर्या पाठव(च) असे ही आपला हावरटपणा झाकून सांगायला विसरायचे नाही !


ही बरणी तुम्ही अंगणात, गच्चीवर, बाल्कनीत ठेवणार असाल उन्हाळ्यातल्या वळीवापासून सावधान कारण पावसाचा एखादा शिंतोडा तुमच्या या सगळ्या केल्या धेल्यावर पाणी पाडेल वा पाणी पाडायला पुरेसा आहे!!

©️सुलभा जाधव

रविवार, १८ एप्रिल, २०२१

वाटीभर भडंग

#आजचा बेत -२

भडंग ची रेसिपी टाकायची म्हणजे हा शुद्ध आगाऊपणा ! भडंग करण्यात काहीही नावीन्य नाही. म्हणजे बायकांना अर्ध्या रात्री उठून भडंग कर म्हणलं तरी त्या डोळे झाकून करतील! अगदी बे चा पाढा म्हणण्यासारखी याच्यासाठ ही सरावाची गोष्ट आहे. भडंग साठी लागणारा ज्याला आमच्या उस्मानाबादकडे चुरमुरा,पुण्याकडे कुरमुरा, इतर महाराष्ट्रातला मुरमुरा म्हणतात. हा पोकळ नसून भरीव असतो, पृथ्वी तलावर फक्त तो सातारा,सांगली,कोल्हापूर इथेच मिळतो. पुण्यात जशी बाकरवडी तशी या तीन जिल्ह्यांमध्ये भडंग. मी उस्मानाबादची आणि उस्मानाबाद मध्ये आम्हाला या भडंगच फार अप्रूप. वडील शिक्षकी पेशातले, कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत, सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांची सगळी सेवा ही तुळजापूर आणि उस्मानाबाद येथेच झाली. बालपणीच्या काही गोष्टी आपल्या मनात अश्या कोरलेल्या असतात की त्याचा कधी विसर पडत नाही त्यातलीच ही भडंग. वडील कोल्हापूरला त्यांच्या संस्थेत कुठल्या मिटींगला गेले की येताना ज्योतिबाचा गुलाल, दवणा आणि पोतभर भडंग घेऊन यायचे. पुढे काय...मी कोल्हापूरची सूनच झाले ! मग मग काय दूधो न्हाओ भडंग से !!! मला एक पितळेच भलं मोठं पातेलं सासूबाईनं कडून खास भडंग हलवण्यासाठी मिळालय ! फोटोत दिसेलच. (त्याच्या कळकटलेपणावर जावू नका कारण बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हे मागचे वर्षभर कोरोणाच्या कृपेनुळे झालेलेच नाही😝) ही भडंग माझ्या अशी मदतीला धावून येते की तीची किंमत मीच जाणो. बाजीप्रभूंनी जशी दोन्ही हातात तलवार घेऊन पावन खिंड लढवली तश्या मी वाटीभर भडंगच्या जोरावर अनेक खिंडी लढवलेल्या आहेत. अचानक घरी टपकले पाहुणे, वेळी-अवेळी लागणारी भूक, काहीतरी खमंग चटपटीत खायचय, आता काय खाऊ या सगळ्यावर एकच उत्तर- वाटीभर भडंग !!! भडंग चे टिपिकल चुरमुरे आणि लसुन,कढीपत्ता,हिंग आणि शेंगदाणे यात लपलेला त्याचा प्राण ! याशिवाय त्याला भडंग म्हणणं हे पापच. इथे ओरिसात मला भडंग साठी लागणारे टिपिकल चुरमुरे मिळत नाहीत. काही गोष्टी मिळतच नाहीत त्यात माझी मुलं यातले शेंगदाणे खात नाहीत म्हणून मी या शेंगदाण्याना फाटा दिलाय मग मजबूरी का नाम... म्हणत मी जे काय करते त्यालाच भडंग म्हणतेय. उडिया भाषेत चूरमुऱ्याना मुडी म्हणतात. दारावर भाजी विकायला यावी तशी इकडे गावोगावी, शहरोशहरी मुडीचे पोते सायकलला बांधून मुडीवाला दारावर मुडी विकायला येतो. ठराविक रुपयांना ठराविक आकाराच्या डब्याचे माप अशी ती मोजून मिळते.आज सकाळी मी चाळीस रुपयाची मुडी विकत घेतलेलीय आणि या वाटीभर मुडीचा घाट घातलाय. 👉साधारण दोन ते तीन गड्डे सोललेला लसूण 👉भरपूर हिरवागार ताजा-ताजा(हे ऑप्शनल आहे) कढीपत्ता 👉चिरुन उन्हात वाळवलेला कांदा ( तो मी करून ठेवलेला होता.) 👉जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट,मीठ आणि पिठीसाखर

👉कढईत अंदाजे वाटीभर तेल गरम करायचे त्यात अगोदर सोललेला लसुन ओबडधोबड चेचून घेवून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तळून घेतलेला हा लसून चुरमुरयावर एका बाजूला ओतून ठेवायचा. 👉त्याच तेलात कढीपत्ता तळून घ्यायचा. गरम तेलात कढीपत्ता टाकल्याबरोबर तेल उडते तेव्हा एका हातात कढीपत्ता आणि दुसऱ्या हातात एक ताटली घ्यायचीच. कडीपत्ता टाकला रे टाकला की दुसऱ्या हातातली ताटली त्या कढईवर धरायची जेणेकरून तेलाचा भपकारा सगळ्या घरभर उडणार नाही. 👉कढीपत्ता तळून घेतल्या नंतर तेलाचा ताव बर्‍यापैकी कमी झालेला असतो, त्याच आचेवर वाळवलेला कांदा तळून घ्यायचा.तो काळा होणार नाही याची पुरती काळजी घ्यायची. 👉हे तिन्ही जीन्नस चुरमुर्यावर वेगवेगळ्या बाजूला ओतून ठेवायची. 👉 त्यानंतर गॅस बंद करून गरम तेलात एकानंतर एक जिरे, मोहरी,हिंग, हळद आणि अजून एकदोन मिनिटांनी लाल तिखट घालायचे. 👉ही फोडणी अशीच बाजूला ठेवून, दुसऱ्या बाजूला जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही यासाठी एक कॅरीबॅग हातात घालून चुरमुरयावर ओतलेले कढीपत्ता लसून कांदा याचे ढीग कुस्करून घ्यायचे. 👉आता कढईतील तेलाची फोडणी या चुर्मुर्यावर टाकून हे सगळं चांगलं घोळून घ्यायचं.





👉शेवटी मीठ आणि पिठीसाखर पेरून हे सगळं प्रकरण एक लिंबू बाई दोन लिंबू या ठेक्यावर पखडल्यासारखं झेलत राहायचं.
तळलेला कढीपत्ता, लसुन, कांदा, हिंग याचा जो दरवळ घरभर पसरलेला असतो त्यावरून सगळ्यांना अंदाज येतोच की ही बाई तिची वाटीभर भडंग घेऊन पुढचे काही दिवस खिंड लढवायला तयार झालेली आहे !
-सुलभा जाधव 

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

#भेंडींच्या दाण्याचे कालवण


आजचा बेत -१ 
#भेंडींच्या दाण्याचे कालवण 


बागेत दिवसातून चार वेळा फेऱ्या होत असून सुद्धा कोपऱ्यातल्या भेंड्या काढायला आलेल्या आहेत याकडे तुमचं लक्षच न जाणं हे अगदी खरं खरं पण न पटणारं कारण हा एक महत्त्वाचा घटक आहे आजच्या रेसिपीचा. 

या भेंड्या जेव्हा तोडून घरात आणल्या तेव्हा कोल्हापूरी भाषेत जून व मराठवाड्या कडील नीबर झालेल्या भेंड्यांच करायचं काय हा मोठा प्रश्न. 

अशावेळी सासूबाईंची एकदम हुकमी रेसिपी कामाला येते.
हो, समीरा रेड्डी सारखा सासु सोबत शो करता येत नसला तरी आमच्यातही अव्यक्त अबोल असे को-ऑर्डिनेशन  आहेच की !बाय द वे मी समीरा रेडी आणि तिच्या सासूची अधून मधून फॅन असते बरं का ! 

बरं आत्ता भेंड्या सोलून घ्यायला सुरवात करायची. सोलातानाच ठरवायचं की आपल्याला याच्यावर पोस्ट लिहायची आहे त्यामुळे कसं आपलं दुर्लक्ष झालं म्हणूनच भेंड्या नीबर झाल्या,जरा लक्ष दिलं असतं तर कोवळया तेल ऑरगॅनिक सोन्यासारख्या भेंड्यांची किती चवदार भाजी झाली असती असे दोष स्वतःला देत बसत नाही आपण. 

सोललेले दाणे त्याचा लगेच एक फोटो काढून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर त्याचा फोटो guess what ? या कॅप्शन खाली टाकायचा. मधूनमधून "ज्वारीच्या घुगर्या"  असे रिप्लाय आलेले असतात ते वाचून मनोमन हसायचे.
तुम्हाला नाहीच मुळी ओळखू येणार असं पुटपुटायचे. म्हणजे उरली सुरली गिल्ट कुठल्या कुठे  निघून जाते आणि आपण काहीतरी मोठे तीस मार खान काम करणार आहोत याचा फील येतो. 



घरात थोरली, मधवी, धाकटी अशा तीन लोखंडी कढया असतील तर त्यातली धाकटी कढई घेऊन त्याच्यामध्ये हे भेंडीचे दाणे गुळदाव परतून घ्यायचे.



भांड्यात तुमच्या अंदाजाने तेलात लसणाच्या दोन पाकळ्या ठेचुन घालायच्या त्यावर आलं, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं याचे टिपिकल हिरवे वाटण ओतायचे.






त्या गर्द पोपटी रंगाच्या प्रेमात पडायचे मात्र इथे समाधी लागू द्यायची नाही त्याच्यावर ढळत्या हाताने तीन-चार चमचे कोल्हापुरी चटणी टाकायची.
माझी इस्लामपूर सांगली येथून थोरल्या नंदे कडून आलेली चटणी आहे. 


या मसाल्याला तेल सुटू लागले की त्याच्यामध्ये परतलेले भेंडी चे दाणे ओतायचे.पळीने एकदा चांगले फिरवून घेतल्यानंतर भेंडीचे दाणे बुडतील इतपतच कोमट केलेले एक वाटी पाणी घालायचे.
पहिली उकळी आल्यानंतर शास्त्र म्हणून एक चमचा शेंगदाण्याचे कूट घालावे जेणेकरून हे कालवण दबदबीत दाटसर होईल.

घरात महाराष्ट्रीयन भाज्या-आमट्याना नाक मुरडणारी टीनेजर मुलं असतील तर बिनधास्त उसळ आहे असे ठोकून द्या. किटो डायटच्या नावाखाली खपून जातं.
आजाचाच जिवंत अनुभव आहे. 

बऱ्याच भाज्यांच्या बियांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्यामुळे हे पोष्टिक कालवण आहे.
असे दबदाबित कालवण होईल इतक्या बिया तुमच्याकडे नसतील पण कधीतरी भाजीवल्याने नजरचुकीने ४-५ निबर भेंड्या वजनात भरल्या तर तळतळ नकरता भेंड्या सोलून ते दाणे रोजच्या डाळीच्या आमटीत घाला. 

©️ सुलभा जाधव

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

 कैरी मोहत्सव-१ 

म्हणजे असं आहे की शेजारी एक घर रिकामं आहे.

तिथे एक भलमोठा आंब्याचं झाड आहे त्याला अशक्य हिरव्याकंच कैऱ्या लटकत आहेत.

घरातून बाहेर पडून रस्त्याला लागेपर्यंत कितीही मान वळवून दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी त्या काही नजरेआड होत नाहीत.

त्यांना बघून तोंडाला पाणी सुटतं ते घटाघटा गिळाव तर लागतं वरतून त्या  कैरीचं काय काय करता येईल याची विचारचक्र चालू राहतात. झाड जरासं मागे पडलं की विचारही मागे पडतात पण ते तेवढ्यापुरतेच कारण घरी परत येताना पुन्हा झाड डोळ्यासमोर आणि पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर.

तेरे चेहरे से नजर नही हटती नजारे हम क्या देखे टाईप्स !

बरं,

शेवटी आज दहा-पंधरा कैऱ्या तिथल्या तोडून आणल्या तोडून कसल्या चोरूनच. 

पण चोरून तरी कसं म्हणणार ओ ??? कारण कुणाला विचारून आणायच्या सध्या ते घर रिकामच आहे. 


सगळ्यात मोठ्या- मोठ्या चार कैऱ्या घेतल्या एकदा प्रेमाने त्यांना गोंजारले आणि पदर खोचून पुढच्या कामाला एक मिनिट हि न दडवता सुरुवात केली. 

कडक उन्हाळ्यात दुपारी दीड दोनच्या सुमारास किचन मध्ये उभा राहून टंगळमंगळ करायला ते काही थंड हवेचे ठिकाण काश्मीर, शिमला, उटी मनाली नक्कीच नाही ना !

मग काय दहाव्या मिनिटाला इथून बाहेर पडायचे हे ठरवूनच त्या कैऱ्या नळाखाली खळाखळा धुतल्या, खसाखसा पुसल्या, बोटाच्या पेरा ईतका आकार धरून भसाभसा चिरल्या.


चहाच्या चमचा ने एक चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा हिंग, हे एक लाडकं प्रकरण आहे. डबी उघडली की अगोदर ती नाकापुठे न्यायची, जुन्या बायका नाकपुडीतून  तपकिर ओडायच्या तसा आपण फक्त उर भरून वास घ्यायचा. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद,लिंबाएवढा गुळाचा खडा, फोडणीसाठी पाच-सहा चमचे तेल हे जिन्नस पटापटा गोळा केले. 




झटकन ट्रोलीतून कडल बाहेर काढलं.

या कडल्या ची गोष्ट लगे हात सांगूनच टाकते.हा याचा तिसरा जन्म. 

तो असा, मला लोखंडी कडल घ्यायचं होतं ते काही केल्या मला मिळत नव्हतं. इकडे ओरिसात लहान मोठ्या यात्रा असतात-  यात्रेत छोटी-छोटी दुकान थाटलेली असतात. संसारात लागणाऱ्या जवळजवळ सगळ्या लहान सहान गोष्टी तिथे मिळतात. मात्र मला पाहिजेअसं लोखंडी कडल काही कुठे मिळत नव्हतं. अशाच एका यात्रेतल्या दुकानात मला लोखंडी पळी दिसली. त्या पळीचा दांडा हातभर लांब होता. ही पळीच आपण कडल्यासारखी वापरू असा विचार करून मी ती सात वर्षांपूर्वी तीस रुपयांना खरेदी केली. तिचा तो हातभर दांडा डोळ्यांना फारच डाचत होता. एकदा घरात काहीतरी बांधकामासाठी मोठा हातोडा खरंतर घन घेऊन मिस्त्री आलेले होते त्या मिस्त्री कडून तो दांडा मी अर्धा तोडून घेतला. असा तिचा दुसरा जन्म. पुढे अर्ध्या तुटक्या दांड्याची ती पळी गॅसच्या बर्नरवर कधीच नीट बसली नाही. पण सांगायचे कुणाला आपलीच अक्कल !

प्रत्येक वेळी फोडणी करताना तिची डुग डुग सांभाळण्यात अर्धा जीव आणि आर्धा त्यात कडलेल्या तेलात एकानंतर एक जिन्नस टाकण्यात. पूर्ण  मन लावून फोडणीवर लक्ष कधीच देताच येत नव्हते. त्यावर इलाज म्हणून तो दांडा पुन्हा एल सारखा वाकून घ्यावा असा विचार मनात आला व तो अशाच एका संधीचे सोन करून घेण्याच्या बेतात वाकवून घ्यायला गेले तो त्याचा दांडा च मोडला. आता बसा.

घरी एकदा वेल्डिंग मशीन आली होती तेव्हा त्याला मी वेल्ड करून घेतले असा त्याचा तिसरा जन्म.

इतके पुनर्जन्म झाल्यानंतर पुढे किती ही सुबक कडली आली तरी हे कडलं काही मला बदलू वाटणार नाही की कुणाला देऊ वाटणार नाही. तसा जीवच जडलाय त्याच्यावर आणि माझा संसार कडेला जाईपर्यंत मी काही हे बदलेल असं वाटत नाही.

तर मूळ मुद्द्यावर 

तापलेल्या कढल्यात अगोदर मोहरी भाजून घेतली नंतर मेथी भाजून घेतली. अगोदर मोहरी भरड पूड करून बाजूला ठेवली  नंतर मेथीची भरड पूड केली. कढल्यात तेल ओतलं तेल कडक तपल्यानंतर गॅस बंद केला. त्यात अगोदर मोहरीची पूड व नंतर मेथीची पूड घातली. पूड जेवढी झाली होती ती सगळीच्या सगळी नाही टाकली ती जरा जास्त होतीय असं वाटलं तुम्ही पण तुमचा ऐनवेळेचा अंदाज नक्की घ्या. त्यानंतर हिंग,लाल तिखट आणि हळद हे एकामागून एक घातले. ही सगळी चरचरीत फोडणी कैरीच्या फोडींवर ओतली (तेव्हा एका हाताने व्हिडिओ करत होते.)



हे जे डोळ्यासमोर एका बाऊलमध्ये दिसत होतं त्यात तो लिंबाएवढा गूळ चिरून पसरला आणि या गोड प्रकरणाला(कुंड्याला) एखाद्या गोडूल्या बाळासारखे दोन्ही हातात धरुन पाखडल्या सारखे झेलत होते.

इति फायनल प्रॉडक्ट चा फोटो काढायचा राहून गेला मात्र   हे सगळं घुसळलेली एक कैरीची फोड देवाला द्यायला आठवणीने बाजूला काढून ठेवलीय कारण कैऱ्या न विचारता न आणल्या होत्या ना . लहानपणी असं काही चुकीचं केलं की एक घास देवाला देऊन खाण्याची  आमच्यात बोत होती !!!

कारण की वाढदिवस,केक आणि हिमरू साडी 

#latepost 

कारण की,आज आंबेडकर जयंती आहे त्यानिमित्ताने.

कारण की, आज बहुतेक राज्यांमध्ये हिंदू नववर्ष सुरू होतेय.

कारण की, आज हनुमान जयंती आहे.

कारण की, आज रमजान महिन्याचा पहिला दिवस आहे.

कारण की, आज माझा वाढदिवस आहे.

(कसलं नशीब घेऊन जन्माला आले ना ! ) 

जगात तुमचा वाढदिवस कोणी आठवणी ठेवो अथवा न ठेवो, कुणाच्या आठवणीत राहून न राहो

 पण याच जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी तुमचा वाढदिवस जंगी साजरा होतो तो म्हणजे, 

जीवाभावाचे व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक !! 


अतिशय सुरेख गार्डन थीम्स चे डेकोरेशन केलेला आइसिंग केक मिळाला. (केक वैगेरे कापून साजरे केलेले वाढदिवस तुरळकच)

कारण की एवढा छान केक कापणं,followed by फोटो सेशन मग साडी नेसण आलच.

कारण की मी हिमरु साडी नेसलीय.

कारण की ही साडी आमच्या मराठवाड्यात तयार होते.

कारण की मराठवाड्यात माझे माहेर आहे.

कारण की माहेरची काडी बायकांना सासरच्या माडी पेक्षाही प्रिय असते आणि ही तर माहेरची साडी आहे.

तर आज या हिमरू साडी विषयी.

हिमरू साडी औरंगाबाद च्या आसपास विणली जाते. मोहम्मद तुघलकाच्या काळात जेव्हा त्याची राजधानी त्याने दिल्लीवरून दौलताबादला हलवली त्याच काळात हिमरू साडीचा जन्म झाला. पुढे मुघलांच्या काळात अजूनच नावारूपास हे हातमाग वस्त्र येत गेलं.

हिमरुचा या शब्दाचे मूळ "हम -रूह" मध्ये सापडते याचा अर्थ सारखेपण, साम्य.

हे साम्य,सारखे पण कशा सोबत तर पर्शियन नक्षीकामासोबत.

पर्शियन नक्षीकामाची छाप जशीच्या तशी हिमरू विणकामात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे मी म्हणेन.राज घराण्यांत सोन्या-चांदीच्या तारांमध्ये या कापडाचे साडीचे विणकाम होत होते. राजघराण्याशी संबंधित असलेली हे कापड, साडी पुढे- पुढे एक धागा रेशीम व एक धागा सुत अशी विणली जाऊ लागली तेव्हाच ते जनसामान्यांच्या आवाक्यात आले असणार.

उत्तरेतील बनारस साडीत दिसून येणारी किंख्वाब, शिखरगा,खडीयल, तांचोई प्रकारची ची नक्षी साडीवर, शालीन वर दिसून येते.

वजनाने अतिशय हलकी पण त्यात बरोबर राजेशाही अविर्भाव मनात जागी करणार्या या साडीच्या मी प्रेमात आहे.

©️ सुलभा जाधव
















 रवीवार बेत -१ 


भुवनेश्वरात माझे वास्तव्य आहे, त्यामुळे अमळ सी फूड !

आपलया मुंबई सारखीच चंगळ समजा. 

काल एका (घरातील )इतरांसाठी भला व ज्याला माझा रविवारचा आनंद बघावला नाही अश्या family friend ने परादीप पोर्ट वरून अगदी ताजे समुद्री मासे- प्रॉनस घरी घेऊन आला.

रविवारी मासे विक्रेते त्यांच्याकडे मासे खरेदी केले नसतील तर स्वच्छ करून देत नाहीत.

या सगळ्या पार्शवभूमीवर स्वच्छता माझ्याकडे येणार होती. मी माझ्याकडे मोठेपणा घेण्याची संधी न दडवता हो करेन मीच सगळे असा पवित्रा घेतला.

माश्याची शीतपेटी परदीप ते भुवनेश्वर प्रवास ईतका व्यवस्थित करून आली होती की त्याला न्याय देणं ही मला माझी जबाबदारी वाटली.


बेटकी मासा साधारण एक किलोचा होता. या माशांचे दोन व  एक असे पदार्थ करायचे ठरले.

(एखादा पदार्थ कुणाला आवडला नाही तर फ्रीजमध्ये ठेवून दोन दिवस आपणच  हादडायला ही मनोमन तयारी ही केली होती).

@मराठी माशाचा रस्सा हिरवे वाटण व कोल्हापुरी चटणी घालून.


@चिली गार्लिक prawns विथ रेड वाइन.

यात रेड वाईन कधी घालायची ते मी YouTube वर ३-४ व्हिडिओ बघूनच शिकलेय.


@स्टीम फिश विथ हरब्ज यात डॉमिनो पिझ्झा सोबत आलेल्या जास्तीच्या हर्ब्जच्या पुड्या साठवून ठेवतो ना आपण त्यातलेच हर्ब्ज ऑलिव्ह ऑईल आणि रेड वाइन सोबत घुसळून माश्यांच्या तुकड्यांवर लावून मॅरिनेट केले तासभर.


या सगळ्या सोबत ज्वारीची भाकरी कारण घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माशाच्या रश्या सोबत भाकरी ही लागणारच आणि घरातल्या टीनेजर्स साठी भात तो ही  हात सडीचा.

मासा आणि prawns स्वच्छ करायला एक तास लागला.

 माशाचे कल्ले काढताना तर हाताला एक दोन वेळा कापले ही पण आपणच सगळे करायचे हा प्रण केल्यामुळे आणि 

टाक्याचे घाव सोसल्या शिवाय मला देवपण मिळणार नव्हते या म्हणी नुसार देवपण मिळवायच्या नादात त्याकडे  दुर्लक्ष केले गेले.


खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा असल्याचा फील  आज मिळाला कारण मासे आणि प्रॉन स्वच्छ केल्यानंतर जे काही वेस्टेज निघाले ते डेविलला (आमचा पाळीव कुत्रा)  खायला  टाकले. त्यांने खाऊन जेवले ते सगळे वेस्टेज लिंबाच्या झाडाखाली नेऊन पुरले. 


सगळं प्रमाण अंदाजे आहे. मोजून मापून चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं असं काही मी  सांगत बसणार नाही.

इथल्या सगळ्यांनाच फोटोंवरून तो अंदाज येईल हे मी गृहीत धरते.

कोणाच्या काही शंका असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगेनच.

रेड वाइन वापरू केलेल्या पदार्थांसाठी अजून टेस्ट बड्स अजून डेव्हलप झालेल्या नाहीत.  

पण जे काय झालं होतं त्याची अप्रतिम होती.





















बुधवार, ७ एप्रिल, २०२१

बागेच्या गोष्टी - जास्वंद


बागेच्या गोष्टी - जास्वंद 



जास्वंद फारच सामान्य फुलं झाड.

हर नुक्कड चौराहे पर मिल जाता है ना 

त्यात आपल्या गणपती बाप्पांना प्रिय असलेल्याने मराठी माणसाला हे अतिपरीचायाचे !

मला काही फार कौतुक नव्हतच हीच.

फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी हिवाळा  संपता संपता बाग कशी ओकीबोकी दिसू लागते फुलांचे असे अचानक गायब होणे नजरेला आणि मनाला सहन होत नाही, बघवत नाही.

माणूस कसा सवयीचा गुलाम झालेला असतो ना !

फेब्रुवारी ते जुलै चा पाऊस सुरू होईपर्यंतच्या गाळलेल्या जागा भरायला म्हणून मी जास्वंदीचा पर्याय निवडला होता.

एक रंग मग दुसरा मग तिसरा असे करत करत बरेच रंग आत्ता गोळा झालेत !!

Horticulture flowlicuture मध्ये झालेल्या क्रांती नंतर या फुलझाडांचे दिवस बदलले म्हणायला हरकत नाही !

Verigatated Habiscus च्या साधारण २०० प्रकार आहेत म्हणे.

Pollination करायला जमलं तर जस्वंदाचे झाड बिया धारण करत म्हणे त्या बियापासून नवीन झाड उगवून ही येत असं वाचनात आले.

त्याची प्रक्रिया युट्युब बघून मनात विचार आला करून तर बघावे आणि सुरवात केली.

प्रयत्नना किती यश येईल माहीत नाही पण प्रयोग चालू ठेवेन म्हणतेय कारण अश्याही ९-१० रंगाच्या जास्वंदी आहेत माझ्याकडे.

खाली माझ्याकडे फुललेल्या जास्वदीचे फोटो टाकतेय,#chancepedance #चान्सपेडान्सकरणेका जमाना है ना.






Pollination चा छोटा व्हिडिओ जो १३ मार्च ला शूट करून ठेवला होता.




पॉलिनेशन झाल्यानंतर ती  फुलं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे राबराने बांधून ठेवावी . २-३ दिवसांनी सुकलेली फूल गळून पडतात व सीड पॉट तयार होऊन बियांची बोड तयार होतात . बिया धरत असलेली बोंडे रोज बघून येत असते,आहेत ना जागेवर याची खात्री करून घेते.आज फोटो ही काढले.


इथपर्यत आज सांगून टाकतेय कारण फोन मधले फोटो delete करण चालू आहे ! 

बोडामधून बीया येतात का ? त्याची रोप होतील का हे नंतर सांगत राहीनच . 

- सुलभा जाधव