शनिवार, १७ एप्रिल, २०२१

#भेंडींच्या दाण्याचे कालवण


आजचा बेत -१ 
#भेंडींच्या दाण्याचे कालवण 


बागेत दिवसातून चार वेळा फेऱ्या होत असून सुद्धा कोपऱ्यातल्या भेंड्या काढायला आलेल्या आहेत याकडे तुमचं लक्षच न जाणं हे अगदी खरं खरं पण न पटणारं कारण हा एक महत्त्वाचा घटक आहे आजच्या रेसिपीचा. 

या भेंड्या जेव्हा तोडून घरात आणल्या तेव्हा कोल्हापूरी भाषेत जून व मराठवाड्या कडील नीबर झालेल्या भेंड्यांच करायचं काय हा मोठा प्रश्न. 

अशावेळी सासूबाईंची एकदम हुकमी रेसिपी कामाला येते.
हो, समीरा रेड्डी सारखा सासु सोबत शो करता येत नसला तरी आमच्यातही अव्यक्त अबोल असे को-ऑर्डिनेशन  आहेच की !बाय द वे मी समीरा रेडी आणि तिच्या सासूची अधून मधून फॅन असते बरं का ! 

बरं आत्ता भेंड्या सोलून घ्यायला सुरवात करायची. सोलातानाच ठरवायचं की आपल्याला याच्यावर पोस्ट लिहायची आहे त्यामुळे कसं आपलं दुर्लक्ष झालं म्हणूनच भेंड्या नीबर झाल्या,जरा लक्ष दिलं असतं तर कोवळया तेल ऑरगॅनिक सोन्यासारख्या भेंड्यांची किती चवदार भाजी झाली असती असे दोष स्वतःला देत बसत नाही आपण. 

सोललेले दाणे त्याचा लगेच एक फोटो काढून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर त्याचा फोटो guess what ? या कॅप्शन खाली टाकायचा. मधूनमधून "ज्वारीच्या घुगर्या"  असे रिप्लाय आलेले असतात ते वाचून मनोमन हसायचे.
तुम्हाला नाहीच मुळी ओळखू येणार असं पुटपुटायचे. म्हणजे उरली सुरली गिल्ट कुठल्या कुठे  निघून जाते आणि आपण काहीतरी मोठे तीस मार खान काम करणार आहोत याचा फील येतो. 



घरात थोरली, मधवी, धाकटी अशा तीन लोखंडी कढया असतील तर त्यातली धाकटी कढई घेऊन त्याच्यामध्ये हे भेंडीचे दाणे गुळदाव परतून घ्यायचे.



भांड्यात तुमच्या अंदाजाने तेलात लसणाच्या दोन पाकळ्या ठेचुन घालायच्या त्यावर आलं, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं याचे टिपिकल हिरवे वाटण ओतायचे.






त्या गर्द पोपटी रंगाच्या प्रेमात पडायचे मात्र इथे समाधी लागू द्यायची नाही त्याच्यावर ढळत्या हाताने तीन-चार चमचे कोल्हापुरी चटणी टाकायची.
माझी इस्लामपूर सांगली येथून थोरल्या नंदे कडून आलेली चटणी आहे. 


या मसाल्याला तेल सुटू लागले की त्याच्यामध्ये परतलेले भेंडी चे दाणे ओतायचे.पळीने एकदा चांगले फिरवून घेतल्यानंतर भेंडीचे दाणे बुडतील इतपतच कोमट केलेले एक वाटी पाणी घालायचे.
पहिली उकळी आल्यानंतर शास्त्र म्हणून एक चमचा शेंगदाण्याचे कूट घालावे जेणेकरून हे कालवण दबदबीत दाटसर होईल.

घरात महाराष्ट्रीयन भाज्या-आमट्याना नाक मुरडणारी टीनेजर मुलं असतील तर बिनधास्त उसळ आहे असे ठोकून द्या. किटो डायटच्या नावाखाली खपून जातं.
आजाचाच जिवंत अनुभव आहे. 

बऱ्याच भाज्यांच्या बियांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्यामुळे हे पोष्टिक कालवण आहे.
असे दबदाबित कालवण होईल इतक्या बिया तुमच्याकडे नसतील पण कधीतरी भाजीवल्याने नजरचुकीने ४-५ निबर भेंड्या वजनात भरल्या तर तळतळ नकरता भेंड्या सोलून ते दाणे रोजच्या डाळीच्या आमटीत घाला. 

©️ सुलभा जाधव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा