रविवार, १७ जानेवारी, २०१०

ये जिंदगी के मेलें...



दरवर्षीपेक्षा यावर्षीची माझी संक्रांत खूपच वेगळी साजरी झाली.

मी सध्या उत्तर ओरीसात आहे. इथे आदिवासीच आदिवासी. यांच्यासाठी ‘मकर’ हा खास सण. आठ दिवस आधी मकर आहे म्हणून आणि आठ दिवस नंतर मकर झाली म्हणून इथे सुट्टीचा मूड असतो. माझ्या इथल्या घराजवळून बैतरणी नदी वाहते. या नदीच्या काठावर केसरी कुंड जत्रा संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भरते.

नवऱ्याच्य़ा सरकारी लव्याजम्याशिवाय जत्रेची मजा लुटायची असं ठरवून मी माझे सासू-सासरे आणि साडेचार वर्षे वयाच्या ‘मोट्ठ्या’ राऊला घेऊन गेले. माझा अंदाज होता आठवडी बाजारासारखी असेल जत्रा. पण चित्र फारच वेगळं होतं. लगान सिनेमात कसं ती मॅच बघायला लोकं मुंग्यांसारखी सगळीकडून येताना दाखवलीत, अगदी तश्शीच इथं माणसं चहुबाजूंनी नदीच्या काठी गोळा होत होती. मोटरसायकली, जिपा, ट्रक, बशी(!) भरभरून माणसं ओतली जात होती. नटून थटून नवीन कपडे घालून येणारी बच्चे कंपनी तेवढीच, आणि काळे चष्मे, जीन्स, आणि चकमक साड्या घालणारे/ नेसणाऱ्या तेव्हढेच/ तेव्हढ्याच. प्रेमचंदांच्या ‘ईदगाह’ मधल्यासारखेच वातावरण. खेळण्यांची, भांड्यांची, कपड्यांची, बांगड्यांची, मिठायांची दुकानंच दुकानं. फुगेवाले, पिपाणीवाले, ‘झालमूडी’ वाले इकडे-तिकडे फिरत होते. (तुम्हाला एव्हांना जत्रेतले आवाजही ऐकू आले असतील). पाच रूपयांचा फुगा, दहा रुपयांची ‘लाल दिव्याची गाडी’, वीस रुपयांची बंदूक, असं सगळं भाव करत करत आम्ही जत्रा भोगत फिरत होतो. मॉलमधल्या खरेदीनंतर मला कायम एक रितेपण येतं; इथं मला एक वेगळाच आनंद मिळत होता. कदाचित ते बटबटीत बाजारपण नसेल म्हणून, किंवा एक अदृष्य साधेपणा जाणवत असल्यामुळे असेल, एक प्रकारचा नॉस्टॅल्जिया असेल. माझ्या लहानपणी पाहिलेल्या जत्रा आजकाल फारशा दिसत नाहीत; इथे टाइम मशीन मध्ये बसून राऊला माझं बालपण दाखवल्यासारखं झालं – त्यामुळे असेल. राऊ तर तो आख्खा दिवस आणि रात्री उशीरपर्यंत माकडासारख्या नुसत्या उड्या मारत होता.

मोबाइल, गाड्या, कपडे, कोल्ड्रींक्स, कुरकुरे, लेज, इत्यादि शहरी वस्तू इथेही पोचल्या होत्या. वरवर पाहता हा आदिवासी भाग आहे असं कुणाला वाटणारही नाही. मला या वस्तूंशी काहीच देणंघेणं नव्हतं. मला भावलं ते त्या आदिवासी लोकांचं साधेपण, त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आनंद : जो माझ्य़ा मनात खोलवर पोचला आणि अजूनही ते आठवून मी प्रसन्न होतेय!

२ टिप्पण्या: