Thursday, November 5, 2009

सुगरण - १


जरा उसंत मिळाली की नकळत पावलं बाल्कनीत वळतात. आत्ताही असंच झालं. बाल्कनीत उभं राहून इकडं तिकडं बघत रहायला भारी मज्जा येते. आत्ता इथं उभी आहे तेव्हा लक्षात आलं आज सकाळ पासूनच काही नवीन पाहुण्या माझ्या मागच्या आणि पुढच्या बागेत किलबिलाट करत आहेत...त्याच्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळाला नाही. आत्ता जरा लक्ष देऊन याच्यांकडे पाहतेय तेव्हा कळतंय या तर सुगरणी आहेत आणि या बया (baya!) अतिशय व्यस्त आहेत. त्यांचं घर बांधणं चालू आहे ना! चला पुढचा एक महीना मला यांचा ‘काडी काडी गोळा करुन केलेला संसार’नाही पण संसारासाठी जमा केलेल्या काड्या तरी बघायला मिळणार!

मला काही यांच्या नर मादीतला फरक करता येणार नाही; एवढं सांगू शकते की हे पाहुणे १०-१२ आहेत. म्हणजे ५-६ जोडपी. यांच्यांपैकी एका जोडप्याला घरासाठी ‘साईट’ पसंत पडलीय वाटतं. बाकी कुटुंबं "डिसकशन" करतायत. वरच्या पट्टीतली चिवचिव करत आहेत त्या "सुगरणी". आणि गप्प बसून ऐकणारे (ऐकण्याचं नाटक करणारे) "सुगरण". आपण निवडलेली जागा दुसरं कोणीतरी पटकावेल म्हणून की काय एका सुगरणीला भलतीच घाई दिसतीय. केवढ्या घाईघाईने ती नारळाच्या बुंध्यातून एक लांबच लांब दोरी काढतीय. काढलेली दोरी चोचीतच मागे सरकवून दुसरी-तिसरी अशा एकामागून एक दोऱ्या ती काढतीय. एवढं करून ती उडून जातेय आणि दोन-तीन मिनिटांत परत येऊन पुन्हा आपलं काम चालू ठेवतेय...कुठं असेल बरं तिची ‘साईट’?

संध्याकाळच्या काही कामासाठी मी किचन मध्ये आलेय आणि खिडकीतून मला काय दिसतंय माहितीय -आवळ्याच्या डहाळीवर सुगरणीच्या घराचे बीम-कॉलम उभे आहेत! अरे व्वा मला साइट सापडली म्हणायचं. समोरच्या नारळावरून मालवाहतूक मागच्या आवळ्यापर्यंत होतेय तर. खरचं मला या सुगरणींचा काडी काडी गोळा करुन केलेला संसार बघायला मिळणार आहे.

अजून थोडावेळ झोपावं असं रोजच उठताना वाटत असतं. अजून ५ मिनिटं म्हणत म्हणत पुढचा कितीतरी वेळ अंथरुणातच जातो. ‘मस्त चहा पिऊया’ असं आमिष स्वतःला देऊन किचनकडे जायचं..आज किचन मध्ये गेल्यानंतर इतकं भारी surprize मिळेल असं वाटलं नव्हतं. अहो, आवळ्याच्या फांदीवर सुगरणींची कॉलनीच तयार झालीय! अरे मी झोपेत असे पर्यंत इथं २-३ संसार उभे राहीले...माझा आळस कुठ्ल्याकुठे पळून गेला, एकदम तरतरीत वाटू लागलं. बापरे ग्रेटच आहेत या सुगरणी. मला वाटलं होतं महिनाभर तरी ही सिरीयल ‘बाल्कनी चॅनेल’ वर बघायला मिळणार. इथंतर महाएपिसोड without break चालू आहे...


4 comments:

 1. mast. aataa photo sahit pudhachyaa pragateeche vrutt yeu de :)

  ReplyDelete
 2. छान आहे..इतकं जवळून पाखरांच जग पाहायला मिळायला भाग्य लागत...:)
  आणि हो खूपदा जो गडद रंगाचा असतो तो नर आणि मादी फ़िकट असं पाखरांचं तरी असतं...बयामध्ये पण जो एकदम हळदीसारखा पिवळा तो नर आणि फ़िकट मादी...आता तुम्हाला कळेलच लवकर जेव्हा यांचा संसार पुढे जाईल.....

  ReplyDelete
 3. हरेकृष्णाजी, फोटो जालावरील आहेत! पण माझे स्वतःचे फोटॊ टाकीन तेंव्हा आवर्जून सांगीन.

  ReplyDelete