शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

कांचीवरम

 
  घरात घट बसवणे, त्याचे होईस्तोवर सोपस्कार माझ्यावरच येणार हे गृहीत आहे. ‘तितली’ ने बागेत एकही फूल ठेवलेलं नाही. केवढा विरोधाभास.
मग घटाला माळ कशाची घालायची? या नवीन वाढून ठेवलेल्या प्रश्नांशी रोज दोन हात करावे लागत आहेत.

आज dry fruits ची माळ घालावी असे ठरवून ९ बदाम जवळ घेवून बसले.एक-एक बदाम गाठीत गुंफताना ना असा काय जीव कासावीस होत होता काय सांगू! साध्या गाठीच तर मारायच्या होत्या पण अशी दमछाक झाली.. या ९बदाम आणि ९ गाठीनीं नाकी नऊ आणले.

विणणं काय आणि गुंफणं काय कमालीची चिकाटी हवी त्याला, येड्या गबाळ्याचे काम नोहे !

कांचीवरम साडी
-कांचीवरम , तमिळनाडू.
     
कांचीवरम साड्या दक्षिण भारतातील कांचीपुरम शहरात,(तमिळनाडू)विणल्या जातात.
हिंदू पौराणिक कथांनुसार, कांचीवरम साड्यांचे विणकर महर्षि मार्कंडेयांचे वंशज मानले जातात. ते कमळाच्या देठांतून मिळवलेल्या तंतूंपासून देवतांसाठी वस्त्रं विणायचे. काही ऐतिहासिक तथ्यांनुसार, कृष्णदेवरायाच्या काळापासून कांचीवरम कापड/साड्यानां तिच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी जगभर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.
‘कांचीपुरम’ हे रेशमी साड्यांचे मुख्य उत्पादन केंद्र असल्यामुळे ते  ‘रेशीम शहर’ म्हणूनही ओळखले जाते.

कांचीवरम साडीची दखल भारत सरकारने घेतल्यावर तिला २००५-६ मध्ये भौगोलिक संकेतक (Geographical Indicator) चे स्थान मिळाले.

कांजीवरम साडीच्या निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे मलबारी रेशीम वापरले जाते. कांचीवरम रेशीम साडी ज्या प्रकारे विणली जाते ज्याला कोरवई पद्धत असेही म्हटले जाते. यात तीन धाग्याच्या गुंड्या (दोऱ्याचा रीळ) वापरल्या जातात. एकजण उजव्या बाजूस काम करत असतो तर त्याचा सहकारी डाव्या बाजूला दुसरी गुंडी घेवून विणायला मदत करतो. तिसरी गुंडी पदरासाठी असते.
या पद्धतीत साड्यांचे काठ आणि पदर सारख्याच रंगाचे असतात तर साडीचा तागा वेगळ्या रंगांचा. काठ आणि पदर सामान्यतः साडीच्या ताग्यापेक्षा बरेच भिन्न असतात.
स्वतंत्रपणे विणलेला पदर,काठ आणि साडीचा तागा या तिघांना शेवटी सौम्यपणे एकत्र सामील करत गुंफणं हे मोठे कलाकुसरीचे काम !
कांचीवरम साडीची रुंदी इतर रेशमी साडीपेक्षा जास्त असते सामान्य साडीची रुंदी 45 इंच असेल तर कांचीवरम साडीची रुंदी 48 इंच असते. या साड्यांचे रंगही लगेच डोळ्यात भरणारे चमकदार गडद व भडक असतात.
कांचीवरम साडीच्या विणकामात फक्त जर, शुद्ध चांदीची जर वा सोन्याच्या पातळ तारा यांचा वापर असतोच. सूर्य, चंद्र, मोर, हंस, रथ ,कोयरी आणि मंदिराचे नमुने यांत वापरले जातात. राजा रवीवर्मानीं काढलेली महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये दर्शविणारी चित्रं पदरांवर विणली गेली आहेत.

एक साडी विणण्यासाठी  ३ विणकरांचा १०ते २०दिवस इतका वेळ लागतो.कौशल्य  आणि मानवी मेहनत यामुळे कांचीपुरम  रेशमी साडी ची किंमत ५ हजारांपासून  सुरू होते आणि वाढते ती लाखोंपर्यत !

२००८ मध्ये प्रर्दशित झालेल्या “कांचीवरम “या तमिळ सिनेमात कांचीपुरम येथील रेशीम विणकरांचे संघर्ष आणि शोषण प्रभावीपणे दर्शविले आहे.

लेहंगा,चनियाचोळी, घागरा यांचे चलन असताना आजही दक्षिण भारतीय मुलगी कांचीवरम न नेसता लग्नाच्या मांडवात उभी राहणे निव्वळ अशक्य. एकच कांचीवरम साडी तीन-चार पिढ्यांत चालत आलेली कितीतरी उदाहरणं आहेत आणि असा ठेवा/ वारसा जोपासणाऱ्या नव्या पिढ्या सुद्धा !

-सुलभा निपाणीक-जाधव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा