शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

कांचीवरम

 
  घरात घट बसवणे, त्याचे होईस्तोवर सोपस्कार माझ्यावरच येणार हे गृहीत आहे. ‘तितली’ ने बागेत एकही फूल ठेवलेलं नाही. केवढा विरोधाभास.
मग घटाला माळ कशाची घालायची? या नवीन वाढून ठेवलेल्या प्रश्नांशी रोज दोन हात करावे लागत आहेत.

आज dry fruits ची माळ घालावी असे ठरवून ९ बदाम जवळ घेवून बसले.एक-एक बदाम गाठीत गुंफताना ना असा काय जीव कासावीस होत होता काय सांगू! साध्या गाठीच तर मारायच्या होत्या पण अशी दमछाक झाली.. या ९बदाम आणि ९ गाठीनीं नाकी नऊ आणले.

विणणं काय आणि गुंफणं काय कमालीची चिकाटी हवी त्याला, येड्या गबाळ्याचे काम नोहे !

कांचीवरम साडी
-कांचीवरम , तमिळनाडू.
     
कांचीवरम साड्या दक्षिण भारतातील कांचीपुरम शहरात,(तमिळनाडू)विणल्या जातात.
हिंदू पौराणिक कथांनुसार, कांचीवरम साड्यांचे विणकर महर्षि मार्कंडेयांचे वंशज मानले जातात. ते कमळाच्या देठांतून मिळवलेल्या तंतूंपासून देवतांसाठी वस्त्रं विणायचे. काही ऐतिहासिक तथ्यांनुसार, कृष्णदेवरायाच्या काळापासून कांचीवरम कापड/साड्यानां तिच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी जगभर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.
‘कांचीपुरम’ हे रेशमी साड्यांचे मुख्य उत्पादन केंद्र असल्यामुळे ते  ‘रेशीम शहर’ म्हणूनही ओळखले जाते.

कांचीवरम साडीची दखल भारत सरकारने घेतल्यावर तिला २००५-६ मध्ये भौगोलिक संकेतक (Geographical Indicator) चे स्थान मिळाले.

कांजीवरम साडीच्या निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे मलबारी रेशीम वापरले जाते. कांचीवरम रेशीम साडी ज्या प्रकारे विणली जाते ज्याला कोरवई पद्धत असेही म्हटले जाते. यात तीन धाग्याच्या गुंड्या (दोऱ्याचा रीळ) वापरल्या जातात. एकजण उजव्या बाजूस काम करत असतो तर त्याचा सहकारी डाव्या बाजूला दुसरी गुंडी घेवून विणायला मदत करतो. तिसरी गुंडी पदरासाठी असते.
या पद्धतीत साड्यांचे काठ आणि पदर सारख्याच रंगाचे असतात तर साडीचा तागा वेगळ्या रंगांचा. काठ आणि पदर सामान्यतः साडीच्या ताग्यापेक्षा बरेच भिन्न असतात.
स्वतंत्रपणे विणलेला पदर,काठ आणि साडीचा तागा या तिघांना शेवटी सौम्यपणे एकत्र सामील करत गुंफणं हे मोठे कलाकुसरीचे काम !
कांचीवरम साडीची रुंदी इतर रेशमी साडीपेक्षा जास्त असते सामान्य साडीची रुंदी 45 इंच असेल तर कांचीवरम साडीची रुंदी 48 इंच असते. या साड्यांचे रंगही लगेच डोळ्यात भरणारे चमकदार गडद व भडक असतात.
कांचीवरम साडीच्या विणकामात फक्त जर, शुद्ध चांदीची जर वा सोन्याच्या पातळ तारा यांचा वापर असतोच. सूर्य, चंद्र, मोर, हंस, रथ ,कोयरी आणि मंदिराचे नमुने यांत वापरले जातात. राजा रवीवर्मानीं काढलेली महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये दर्शविणारी चित्रं पदरांवर विणली गेली आहेत.

एक साडी विणण्यासाठी  ३ विणकरांचा १०ते २०दिवस इतका वेळ लागतो.कौशल्य  आणि मानवी मेहनत यामुळे कांचीपुरम  रेशमी साडी ची किंमत ५ हजारांपासून  सुरू होते आणि वाढते ती लाखोंपर्यत !

२००८ मध्ये प्रर्दशित झालेल्या “कांचीवरम “या तमिळ सिनेमात कांचीपुरम येथील रेशीम विणकरांचे संघर्ष आणि शोषण प्रभावीपणे दर्शविले आहे.

लेहंगा,चनियाचोळी, घागरा यांचे चलन असताना आजही दक्षिण भारतीय मुलगी कांचीवरम न नेसता लग्नाच्या मांडवात उभी राहणे निव्वळ अशक्य. एकच कांचीवरम साडी तीन-चार पिढ्यांत चालत आलेली कितीतरी उदाहरणं आहेत आणि असा ठेवा/ वारसा जोपासणाऱ्या नव्या पिढ्या सुद्धा !

-सुलभा निपाणीक-जाधव


मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

नामिक-अनामिक-नामिक



हे पिल्लु (पांढऱ्या रंगाचे) आमच्याकडे आले तेव्हा ४५ दिवसांचे होते. त्याच्या साथीदारांमधे/भाऊबंदामधे/जातवाल्यामधे याचे रुप फारच देखणं . या पिल्लाचं चालणं,याचा रंग यावरुन एकमताने त्याला नाव मिळाले "ऐश्वर्या".

साधारण ४-५ महीन्याने जेव्हा याला तुरा फुटू लागला तेव्हा आमच्या लक्षात आले
 ही" ऐश्वर्या "नाही. हे पिल्लु "तो" आहे आणि बिच्चारं लगोलग अनामिक होवून बसलं.

दिवस गेले. महिने गेले. एक दिवस चिरंजीव(वय वर्ष ६ १/२ ) ओरडत घरात आले,

" आई, इथं काय करत बसली आहेस ? तिकडं चल सिकंदर आणि पोरसचं युद्ध जुंपलं आहे "

" कोण सिकंदर ? कोण पोरस ? कसलं युद्ध ? .....मी तुला म्हणाले होते ना  T.V. बघायचा नाही म्हणून . जा बॅग भर ट्यशनची वेळ झाली."

" नाही तु चल आगोदर बाहेर "

काहीतरी प्रताप पहायला मिळणार गेलच पाहिजे बाहेर . बाहेर जावून बघते तर चिरंजीव सांगतात:

"हा सिकंदर-


हा पोरस-



यांच युद्ध चालू होतं. ( खरच यांच्यात चांगलीच जुंपली असणार. बिच्चाऱ्या पोरसच्या शेपटीचे एकच पीस शिल्लक आहे! )

 बघतच उभी राहिले . माझ्या कडून जे बारसं होवू घालतच  नव्हते ते या पठ्याने चूटकी सरशी करुन टाकले. उत्सुफपणे मी मनाशी म्हणाले जर "ही दोघं" सिकंदर-पोरस असू शकतात तर या  "त्रिकुटाचे"  बारसं    बादशहा,बेगम,बिरबल  असं  का नाही...?



रविवार, ६ मार्च, २०११

बागेतला डेलिया

आत्ता उन्हाळ्याच्या बागेसाठी जोरात तयारी चालू आहे.त्या आगोदर हिवाळ्यात डेलियानीं फ़ूललेल्या बागेतले हे काही फ़ोटो...
१-१ फ़ोटो अपलोड करण जरा वेळ खाऊ आहे म्हणून ही लिंक.

बुधवार, २ मार्च, २०११

बागेतली प्यांसी

संगणक साक्षरता आणि लेखन एकत्र चालू आहे .सांभाळून घ्या ही विनंती.


https://picasaweb.google.com/100767908448529850558/BagetaliPansy?authkey=Gv1sRgCNK7sI-879fNVA#

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

माझ्या बागेतली प्यांसी

हिवाळ्य़ात कितीही कड्यक्याची थंडी पडली असली तरी ही उमललेली ही प्यांसीची फ़ुलं बघण्यासाठी अंथरुण सोडावच लागे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

ॠतु घरचा !


माझ्या घरात माझ्या माझ्या पुरते ॠतु चालू असतात-कंटाळा ऋतु, म्हणजे मला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो. आंघोळीचा, झोपताना दिवे घालवण्याचा, स्वंयपाकाचा,घर आवरण्याचा, फोन उचलण्याचा,ब्लॉग बघण्याचा असो ही यादी नेहमीच लांब होत जाते.(बर्‍याच वेळेला हाच ॠतु चालू असतो!)

स्वयंपाक ऋतु, बगिचा ॠतु, सिनेमा ॠतु, सहलीचा ऋतु, इ.इ.

मागच्या २-३ आठवड्यात माझा वाचन ऋतु झाला. माझ्या वाचनात बरीच भर पडली.वाचन हा माझा छंद आहे असं सांगण्या इतंक काही मी वाचत नाही. पण मौसमच आहे मग काय विचरता-मी सपाटून पुस्तकांच्या मागे लागले. The White Tiger -Arvind Adiga, The Namesake -Jumpa Lahiri, Rebecca -Daphne DuMaurier, पण ल‌‍‍क्षात कोण घेतो? –ह.ना.आपटॆ. हुश्श. इतकं वाचलं.

व्हाईट टायगरला बूकर का मिळाले असेल हे माझ्या छोट्याश्या मेंदूला कळू शकलं नाही. (तुमच्यापैकी कुणाला कळंल असेल तर मला त्या पुस्तकाचे साहित्यमुल्य अवश्य सांगा.)एवठंच नाही तर या मेंदूने अशीही गुस्ताकी केली की एका शक्यतेचा विचार त्याने केला. तो असा क्राइम डायरीतल्या १-२ स्टोर्‍या एकत्र करून एखादा प्रकाशक शोधावा आणि आपण ही लिहावं काई-बाई. हमखास बूकर आपलाच.( मराठी माणसांने मोठी स्वप्न बघावी म्हणतात.)

बाकी तीन पुस्तकांनी खुप आनंद दिला.हा वाचन ऋतु बदलण्या आगोदर Imagining India आणि Midnight’s children यानां भेटायच आहे.