सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

माझ्या बागेतली प्यांसी

हिवाळ्य़ात कितीही कड्यक्याची थंडी पडली असली तरी ही उमललेली ही प्यांसीची फ़ुलं बघण्यासाठी अंथरुण सोडावच लागे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

ॠतु घरचा !


माझ्या घरात माझ्या माझ्या पुरते ॠतु चालू असतात-कंटाळा ऋतु, म्हणजे मला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो. आंघोळीचा, झोपताना दिवे घालवण्याचा, स्वंयपाकाचा,घर आवरण्याचा, फोन उचलण्याचा,ब्लॉग बघण्याचा असो ही यादी नेहमीच लांब होत जाते.(बर्‍याच वेळेला हाच ॠतु चालू असतो!)

स्वयंपाक ऋतु, बगिचा ॠतु, सिनेमा ॠतु, सहलीचा ऋतु, इ.इ.

मागच्या २-३ आठवड्यात माझा वाचन ऋतु झाला. माझ्या वाचनात बरीच भर पडली.वाचन हा माझा छंद आहे असं सांगण्या इतंक काही मी वाचत नाही. पण मौसमच आहे मग काय विचरता-मी सपाटून पुस्तकांच्या मागे लागले. The White Tiger -Arvind Adiga, The Namesake -Jumpa Lahiri, Rebecca -Daphne DuMaurier, पण ल‌‍‍क्षात कोण घेतो? –ह.ना.आपटॆ. हुश्श. इतकं वाचलं.

व्हाईट टायगरला बूकर का मिळाले असेल हे माझ्या छोट्याश्या मेंदूला कळू शकलं नाही. (तुमच्यापैकी कुणाला कळंल असेल तर मला त्या पुस्तकाचे साहित्यमुल्य अवश्य सांगा.)एवठंच नाही तर या मेंदूने अशीही गुस्ताकी केली की एका शक्यतेचा विचार त्याने केला. तो असा क्राइम डायरीतल्या १-२ स्टोर्‍या एकत्र करून एखादा प्रकाशक शोधावा आणि आपण ही लिहावं काई-बाई. हमखास बूकर आपलाच.( मराठी माणसांने मोठी स्वप्न बघावी म्हणतात.)

बाकी तीन पुस्तकांनी खुप आनंद दिला.हा वाचन ऋतु बदलण्या आगोदर Imagining India आणि Midnight’s children यानां भेटायच आहे.

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

उत्तर द्यावं वाट्लं म्हणून


ट्गने काय भानगड आहे मला माहित नाही. मात्र हे प्रश्न इंनट्रेस्टिंग वाट्ले म्हणून उत्तर द्यावीशी वाट्ली.


1.Where is your cell phone?
किचन मध्ये असवा.

2.Your hair?
आज विंचरलेले नाहीत.

3.Your mother?
माझी strength.

4.Your father?
मी आजवर बघितलेला सर्वात समाधानी माणूस.

5.Your favorite food?
आयतं मिळालेले सगळं!

6.Your dream last night?
आजोबा- आजीला घेउन जग्गनाथ दर्शनाला गेले होते.

7.Your favorite drink?
तिखट रश्य्या सोबत ताक.

8.Your dream/goal?
घराबाहेर पडून काहीतरी constructive काम करयचं आहे.

9.What room are you in?
study.

10.Your hobby?
बागकाम,घराची सजावट.

11.Your fear?
प्रियजणांचा मृत्यु

12.Where do you want to be in 6 years?
मला एक मुल दत्तक घ्यायच आहे,त्यासाठी आर्थिक स्वबळावर उभं व्हावं..

13.Where were you last night?
माझ्याच घरात.

14.Something that you aren’t?
टिपीकल वूमन लाईक.

15.Muffins?
काय सांगू?

16.Wish list item?
काम शोधयचं आहे.

17.Where did you grow up?
नवोदय विद्यालय.

18.Last thing you did?
माझ्या मुलाला खाऊ घातलं.

19.What are you wearing?
स्वेटर,स्कार्फ,पायमोजे,हातमोजे.

20.Your TV?
नवरा बघत बसला आहे.

21.Your pets?
नाहीत

22.Friends?
नातेवाईकांपेक्षा जवळ्चे वाटतात.

23.Your life?


24.Your mood?
सुट्टी संपल्याच्या दुःखात

25.Missing someone?
बहिणीची तीन महिण्याची मुलगी.

26.Vehicle?
नाही

27.Something you’re not wearing?
बांगड्या.

28.Your favorite store?
लहान मुलांच्या खेळ्ण्याचे कोणतेही/एंपोरियम.दोन्ही सारखेच.

Your favorite color?
नेहमी बदलत असतो..आज पिवळा.

29.When was the last time you laughed?
काल

30.Last time you cried?
मागच्या महिन्यात

31.Your best friend?
नवरा. तिच मोठी अडचण आहे.

32.One place that you go to over and over?
कुठ्लीच नाही.

33.One person who emails me regularly?
कोणीही नाही.


मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

‘इडली, ऑर्किड आणि मी’, आणि ‘मी’!




जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुरी-कोणार्क असा सहलीचा योग जूळून आला. ओरिसात पर्यटनाला चांगलाच स्कोप आहे. घरातून बाहेर पडलं, रस्त्याला लागलो की दुतर्फा निर्सग सौंदर्य. मात्र खराब रस्ते आणि राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या गैरसोयी यामुळे पुरी- कोणार्क शिवाय फारसं टूरीझम येथे वाढलेलं दिसत नाही.

आम्ही पुरी- कोणार्क वारी केलेली होती. अनुभवावरुन आम्ही नाश्ता करून मगच कोणार्कला जाण्याचा बेत आखला. कारण कोणार्क मंदिराच्या जवळ एकही ठीकठाक रेस्टॉरंट नव्हतं. विश्वास नाही ना बसत! पण ही मागच्या तीन महिन्यापर्यंतची फॅक्ट होती.

आता चित्र बदललेलं आहे. कोणार्क मंदिरा जवळ ‘कामत’ उघडलेलं आहे. हा आम्हालाही सुखद धक्का होता. कोणार्क मंदिराच्या आवारात यथेच्छ भटकून कामतमध्ये गरमागरम वडा, डोसा, पोंगल इ. वर ताव मारला. ही पोटपूजा करत असताना विठ्ठ्ल कामतांचं कौतुक चाललं होतं, माणूस फारच ग्रेट...मोठी व्हिजन आहे वगैरे गप्पा चालू होत्या. अनुषंगाने ‘इड्ली, ऑर्किड आणि मी’ या त्यांच्या पुस्तकाचा विषय निघाल्याशिवाय कसा राहील! एकूण काय तर कामत पुराण आळवत होतो आम्ही. हाईट म्हणजे जगन्नाथ पुरीत पोहचल्यानंतर तिथंही आम्हाला कामत दिसलं - चला रात्रीच्या खाण्याची मस्त सोय झाली.


पुरी बीचवर वाळूत खेळून, पाण्यात डूंबून, दिवसला ५६ प्रकारचे भोग (नैवेद्य) घेणाऱ्या जगन्नाथाचे दर्शन घेऊन (स्वत:ला भोग लावण्यासाठी) आमची पावलं कामतकडे वळली. पुन्हा आमचं कामतपुराण चालूच- खरं सांगायच तर कारण ही तसंच होतं. इथं ओरिसात कामतांसारख्या उद्योगी व्यावसायिकाची नितांत गरज आहे. व्यवसाय, पर्यावरण आणि नीतिमूल्यं यांची सांगड घालून कामतांनी जगभरात पाचशेहून अधिक हॉटेल उद्योग उभे केले आहेत.

आता योगायोग म्हणजे आम्ही कामत रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढतोय, त्यांचं कौतुक सुरुच आहे, आणि साक्षात विठ्ठल कामत आम्हाला दारात उभे दिसले!

यानंतर या आजिबात वेळ नसणाऱ्या अतोनात बिझी माणसाने आमच्यासोबत एक तास घालवला, ते नुकतंच सुरु करत असलेलं एक फाइव्ह स्टार हॉटेल फिरून दाखवलं, कोणार्कजवळ सुरु केलेलं कुशभद्रा आणि बंगोपसागराच्या संगमावर उभारलेलं ‘इकोव्हिलेज’ बघायला बोलावलं इ. इ. गोष्टी पुन्हा केंव्हातरी! तूर्त एवढंच सांगायचं आहे, की हिंदी सिनेमे अगदीच अशक्य योगायोग दाखवत नाहीत; त्यापेक्षा दुर्लभ योगायोग आपल्याही नशीबात असू शकतात...


(टीप: मी कामतांची आणि त्यांच्या रेस्टॉरंट्स ची फॅन आहे, बस्स! ही त्यांची जाहिरात नव्हे, आणि यात माझा कसलाही बिझिनेस इंटरेस्ट नाही!)

रविवार, १७ जानेवारी, २०१०

ये जिंदगी के मेलें...



दरवर्षीपेक्षा यावर्षीची माझी संक्रांत खूपच वेगळी साजरी झाली.

मी सध्या उत्तर ओरीसात आहे. इथे आदिवासीच आदिवासी. यांच्यासाठी ‘मकर’ हा खास सण. आठ दिवस आधी मकर आहे म्हणून आणि आठ दिवस नंतर मकर झाली म्हणून इथे सुट्टीचा मूड असतो. माझ्या इथल्या घराजवळून बैतरणी नदी वाहते. या नदीच्या काठावर केसरी कुंड जत्रा संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भरते.

नवऱ्याच्य़ा सरकारी लव्याजम्याशिवाय जत्रेची मजा लुटायची असं ठरवून मी माझे सासू-सासरे आणि साडेचार वर्षे वयाच्या ‘मोट्ठ्या’ राऊला घेऊन गेले. माझा अंदाज होता आठवडी बाजारासारखी असेल जत्रा. पण चित्र फारच वेगळं होतं. लगान सिनेमात कसं ती मॅच बघायला लोकं मुंग्यांसारखी सगळीकडून येताना दाखवलीत, अगदी तश्शीच इथं माणसं चहुबाजूंनी नदीच्या काठी गोळा होत होती. मोटरसायकली, जिपा, ट्रक, बशी(!) भरभरून माणसं ओतली जात होती. नटून थटून नवीन कपडे घालून येणारी बच्चे कंपनी तेवढीच, आणि काळे चष्मे, जीन्स, आणि चकमक साड्या घालणारे/ नेसणाऱ्या तेव्हढेच/ तेव्हढ्याच. प्रेमचंदांच्या ‘ईदगाह’ मधल्यासारखेच वातावरण. खेळण्यांची, भांड्यांची, कपड्यांची, बांगड्यांची, मिठायांची दुकानंच दुकानं. फुगेवाले, पिपाणीवाले, ‘झालमूडी’ वाले इकडे-तिकडे फिरत होते. (तुम्हाला एव्हांना जत्रेतले आवाजही ऐकू आले असतील). पाच रूपयांचा फुगा, दहा रुपयांची ‘लाल दिव्याची गाडी’, वीस रुपयांची बंदूक, असं सगळं भाव करत करत आम्ही जत्रा भोगत फिरत होतो. मॉलमधल्या खरेदीनंतर मला कायम एक रितेपण येतं; इथं मला एक वेगळाच आनंद मिळत होता. कदाचित ते बटबटीत बाजारपण नसेल म्हणून, किंवा एक अदृष्य साधेपणा जाणवत असल्यामुळे असेल, एक प्रकारचा नॉस्टॅल्जिया असेल. माझ्या लहानपणी पाहिलेल्या जत्रा आजकाल फारशा दिसत नाहीत; इथे टाइम मशीन मध्ये बसून राऊला माझं बालपण दाखवल्यासारखं झालं – त्यामुळे असेल. राऊ तर तो आख्खा दिवस आणि रात्री उशीरपर्यंत माकडासारख्या नुसत्या उड्या मारत होता.

मोबाइल, गाड्या, कपडे, कोल्ड्रींक्स, कुरकुरे, लेज, इत्यादि शहरी वस्तू इथेही पोचल्या होत्या. वरवर पाहता हा आदिवासी भाग आहे असं कुणाला वाटणारही नाही. मला या वस्तूंशी काहीच देणंघेणं नव्हतं. मला भावलं ते त्या आदिवासी लोकांचं साधेपण, त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आनंद : जो माझ्य़ा मनात खोलवर पोचला आणि अजूनही ते आठवून मी प्रसन्न होतेय!

मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

सुगरण -३


सकाळी जिना उतरुन खाली आले तेव्हा अंगणात (फुटलेली दोन) अंडी पडलेली दिसली. दोन फुटलेली एक शाबूत..कावळा पहाटेच आपलं काम करून गेला होता वाटतं. त्याला अंडीच खायची होती तर या फुटलेल्या अंड्यांचा चट्टामट्टा का नाही केला त्याने? तो जिंवत पिलांच्या शोधात तर नाही? शाबूत अंडं मी अगदी काळजीपूर्वक पुन्हा खोप्यात ठेवलं.


आता मात्र मी ठरवलं, सुगरण सिरीयल पाहणं बंद करणं योग्य. कशासाठी मनाला चुटपुट लावून घ्यायची? आज फुटलेली अंडी बघायला मिळाली. उद्या काय वाढून ठेवलं असेल कोणास ठाऊक? दुपार पर्यत माझा निश्चय दृढ राहीला. त्यानंतर मात्र डळमळला. मन खोप्याकडे धाव घेऊ लागलं. मी बाल्कनीत येवून थांबले. जणू काही झालेलंच नाही अशा थाटात सगळं सुरळीत चालू होतं. कावळ्याचा काही मागमूस नव्हता. त्याला कळून चुकलं असावं याचा नाद सोडलेला बरा! सुगरणी त्यांच्या कामात गर्क. ज्यांच्या घरट्यांतून अंडी पडून फुटली ते सुगरणही (कदाचित) काहीच झालं नाही अशा भावात खोप्याची डागडुजी करत होते. वर वर बघता खोपे बांधून तयार होते. काही खोप्यांत पिल्लांनी जन्म घेतला असेल. म्हणून तर काही सुगरणी खोप्यांच्या नळकांड्यांतून फर्र्कन ये जा करताना दिसत होत्या. वरचे वर खोप्याची वीण घट्ट होत चालली आहे. पक्क्या विणीत पिल्लं अधिक सुरक्षित आहेत.कधी मी आळसावलेली असेन, उदास असेन, परिस्थितीपुढे हतबल असेन, निराशेचे मळभ मनात दाटलेले असेल, आता सगळं संपलं असं वाटेल, तेंव्हा ही सुगरण नक्कीच मला मदत करेल!खोप्यावर पाय रोवून अविरत एका काडीनंतर दुसरी काडी आणून त्याचा प्रत्येक टाका घट्ट सांधणाऱ्या या ज़सुगरणींशी नकळत माझे नाते जडते.


शनिवार, १२ डिसेंबर, २००९

सुगरण २

अगदी २-४ दिवसांत या सुगरणींची सोसायटी उभी राहिली...कदाचित प्रत्येक खोप्यात अंडीही असतील..आता हे सुगरण अंडी उबवतील त्यातून त्याची पिल्लं बाहेर येतील.. सुगरणी त्यांना दाण्यातला दाणा भरवतील..पिल्लं मोठी होतील त्यांना पंख फुट्तील..एकदा का पंख फुटले की पिल्लं या फांदीवरुन त्या फांदीवर झेपावत उंच आसमंतात भरारी घेतील...मी या विचारांतच हरवले होते की कावळ्याच्या काव-काव ने मला भानावर आणले. जणूकाही ही काव- काव माझ्या स्वप्नाळू मनाला जाणीव करुन देतेय सुरळीत घटना घडतील तो संसार कसला? अन काही उलथापालथ न होता प्रसववेदने शिवाय जन्म घेतो तो जीव कसा? काहीतरी निर्माण होतंय तेव्हा लगेचच त्याला नष्ट करु पाहणारं आव्हान त्याच्या समोर असलंच पाहिजे हा निसर्ग नियमच आहे का?


या खोप्याची चाहूल कवळ्याला लागली आहे तर. तो काव-काव करुन त्याचे भाऊबंद गोळा करतोय का या सुगरणींना आव्हान देतोय हे आता तरी माझ्या लक्षात येत नाही. कावळ्याच्या काव-काव ने भेदरुन घरट्यापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या फांद्यावरुन सुगरणींनीही चिवचिवाट चालू केला आहे. survival of the fittest च्या या भयाण नाट्यातला हा sound show मन हेलावणारा आहे.


अहोरात्र खपून बांधलेला खोपा हा कावळा ऐका फट्क्यात जमीनदोस्त करणार. मी ‘हुश्श,शुक-शुक’ करण्याच्या प्रयत्नात आहेच, पण कावळ्याला याचा काही फरक पडत नाही. तो खोप्यावर अगदी तुटून पडला आहे. इतका हुशार आहे हा शत्रू की खोप्याच्या ज्या खोलगट भागात अंडी असतात त्या भागावरच तो टोच्या मारून बोचकारतोय. कुठल्याही क्षणी खोप्याला भगदाड पडणार की संपलं सगळं - मी स्वतःला सांगून टाकलं. सगळ्या ताकदीनिशी कावळा खोप्याला झटतो आहे. काय शिल्लक राहणार आता हा खोपा. मात्र माझा हा विचार चुकीचा ठरला. एवढ्या झटापटी नंतरही सुगरणीचा हा खोपा तग धरून आहे. आश्चर्य म्हणजे खोप्याच्या विणकामावर याचा काही परिणामच नाही. विंचरलेले केस जसे वाऱ्यावर विसकटतात,एक कंगवा - की लगेच पूर्ववत नीटनेटकं डोकं व्हावं तशीच काहीशी या घरट्याची अवस्था झालीय. कावळा मैदान सोडून पळाला आहे आणि सुगरण पुन्हा कंगवा फिरवण्यात – आपलं- डागडुजी करण्यात मग्न!




काड्या काड्या गोळा करुन उभं राहणाऱ्या या संसारात चांगलाच climax आला आहे. संसार चिऊ-काऊचा असो वा माणसांचा; चटके हे ठरलेले आहेत, नाही? आवळ्यावरच्या घरट्यावर हल्ला करून काही मिळालं नाही हे बघून कावळ्यानं समोरच्या नारळावर लटकणाऱ्या खोप्यावर हल्लाबोल केलेला दिसतोय. गवताच्या एका एका काडीने मोठ्या कौशल्याने विणलेला हा खोपा बघण्यात नाविन्याचा, सृजनतेचा जो आनंद मला मिळत होता त्याची जागा आता भीति, असुरक्षितता, उदासपण यांनी घेतलीय...इथं तर कावळा चोचीत खोपा ज्या फांदीत गुंफला आहे तो शेंडाच चोचीत पकडून ३६० अंशात फिरवून उचकटण्याच्या प्रयत्नात आहे. आता मात्र हे बघवत नाही. प्रकरण हाताबाहेर जाण्याअगोदर काहीतरी केलं पाहिजे. मी जळमटं काढण्याचा झाडूच हातात घेऊन उभी आहे. आता येऊच त्या कावळ्याला, बघते त्याला! आला रे आला की चांगला झाडतेच त्याला. पण विचार योग्य असला तरी अवघड आहे. मी इथं चोवीस तास काही पहारा नाही देऊ शकत. आता या सुगरणी आणि त्यांचं नशीब.


काय केलं म्हणजे या कावळ्यापासून खोपा वाचेल? माझा विचार चालूच आहे तोवर पुन्हा ती अगदी नकोशी कर्कश्श काव काव आणि चिवचिवाट कानावर पडला. कावळ्याला हुसकावू म्हणून बाहेर आले आणि पाहते तर काय – माझ्यासारख्याच २-३ बाल्कनी प्रेक्षक मैत्रीणी त्या कावळ्याला हुसकावत आहेत. चला सुगरणींकडे बरीच सहानुभूती आहे म्हणायची!प्रपंचाच्या या लढाईत काय काय होणार आहे...कुठलं दर्शन ही ‘सुगरण संसार’ मालिका मला देणार आहे...

(फोटो इंटरनेटवरून)