मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

 


The Great Indian Kitchen आणि आपण सगळे  

-सुलभा जाधव 


द ग्रेट इंडियन किचन हा मल्याळम सिनेमा अमेझॉन प्राईम वर आलाय हे कळल्या बरोबर तो दीड तास मोकळा वेळ काढून बघितला.
आजपर्यंत बाईच्या पाचवीला पुजलेले स्वयंपाकघर इतक्या थेट कोणी मांडले नव्हते. यासाठी सर्वप्रथम तीन तासाच्या वर किचन मध्ये उभं राहिलं की शिसारी येणार्‍या समस्त स्त्रियांतर्फे मी दिग्दर्शक जो बेबी आणि निर्देशकना मनोमन साष्टांग दंडवत घातलाय !

समाजशास्त्रात "Reproduction of labour power"
अशी एक संकल्पना आहे.या संकल्पनेचा साधा सोपा अर्थ असा की काम करणाऱ्या व्यक्तीची दैनंदिन कार्यक्षमता टिकून ठेवणे.
ही कार्यक्षमता टिकून ठेवण्याची संपुर्ण जबाबदारी अलिखितपणे घरातल्या स्त्रीवर्गावर पडलेली आहे.
घरातून अर्थार्जन करायला बाहेर पडलेली व्यक्ती ही बहुतांशी वेळा पुरुषच असते. मागे राहून reproduction of labour power करणारी व्यक्ती ही स्त्रीच असते.(अपवाद क्वाचित) तिच्या या unpaid,unrecognised श्रमाची दखल कुठला सर्व्हे ,कुठली अर्थव्यवस्था तर सोडा  ज्यांच्या साठी ती रात्रंदिवस झटत असते ती घरातली आपली वाटणारी माणसं ही घेत नाहीत. त्या श्रमाची कुठे मोजदाद आढळत नाही.

सिनेमातली प्रत्येक फ्रेम ही या संकल्पनेवर अबोल भाष्य करते.

रोजचं जेवण,पंगती, जेवणावळी या कुठल्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. याचा सगळा भार हा भारतीय समाजरचनेत घरातल्या बाई वर येऊन पडलेला आहे त्याचे चौफेर आयाम या सिनेमात इतक्या सहतेने पण तितक्याच कौशल्याने चित्रीत केले आहेत.
सिनेमा सुरूच होतो तो तळणं, वाफवण, कापणं,कूकरच्या शिट्या,ताट वाढणं, सजवण, ते टेबलवर मांडणं याने.
सुरुवातीला फ्रेममध्ये नवीकोरी एक गाडी (मुलीला आदण म्हणून मिळालेली) ज्याच्यावर कॅमेरा बराच वेळ ठेवलाय हे रूपक!

तीने उठावं, शुचिर्भूत व्हावं आणि सरळ किचन गाठावं.
सकाळी उठल्यावर स्वतःलाच ते स्वच्छ प्रसन्न दिसावं म्हणून रात्री झोपण्यापूर्वी निगुतीने ते स्वच्छ करावं.
डोक्यात हाच विचार उद्या सकाळी काय करायचे?
सकाळचा नाश्ता संपला की दुपारच्या जेवणाला काय करावे?
दुपारचे जेवण संपले की रात्रीच्या जेवणाला काय करावे?
मग धुणी,भांडी, केर फरशी आहेच.
याच चक्रात तिचा दिवस सुरू होतो आणि संपतो.

त्यात स्वयंपाघरात निगडीत एकातेक गुंतलेली अनेक कामे. जसे की नाश्त्याला फक्त डोसा करायचा म्हणलं तरी त्यासाठी लागणारी पूर्वतयारी-नियोजन म्हणजे,आदल्या दिवशी दुपारीच डाळ तांदूळ भिजवणे ते सहा तासांनी रुबवणे व रात्रभर ते आंबविण्यास ठेवणे.
त्या डोश्या सोबत लागणारे सांबर त्यासाठी लागणाऱ्या ७-८ भाज्या निवडणे- चिरणे, सोबत लागणाऱ्या चटणी साठी खोबरे खवून, एकीकडे तव्यावर डोसे घालने दुसरीकडे सांबर फोडणी टाकने तिसरीकडे ओल्या खोबऱ्याची चटणी करणे. हे सगळं धावत-पळत करणे जेणेकरून घरातल्या सगळ्यांना ते वेळेवर व गरम गरम खायला मिळेल.
सगळ्यांना खाऊ घालून झाल्यानंतर शेवटी जेव्हा स्वतः जेवायला बसायची वेळ येते तेव्हा घरातल्या नव्या सुनेला टेबलावर पडलेल्या उष्ट्या-खरकट्या ताटांची, टेबलावर चघळून टाकलेल्या चोथ्याची किळस येते.घरात नवीन नवीन रुळू पाहणारी ही सून ते उष्ट खरकटे ताट बाजूला सारून  स्वतःसाठी जागा करते तर घरातली आई आहे त्याच नावर्याच्या उष्ट्या ताटात दोन करपे झरपे दोसे  घेऊन पोटात ढकलते हे चित्र अतिशय बोलके आहे.
जेवणं संपता संपता सिंक जवळ धुवायला पडलेला भांड्याचा पाळा वाट बघत असतोच!


नंदेच्या बाळंतपणासाठी सासू बाहेर गावी जाते जाताना बॅग भरून जे जिन्नस घेऊन जाते त्याचे रांधणे,सामानात आप्पे पात्र आणि सोऱ्या न विसरता भरते म्हणजे जिथे ती चाललीय तिथे ही तिची चुलीपासून सुटका नाही हे दिसतंय.

कुटुंबियांच्या वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या भलत्या सवयी हा अजून एक विलक्षण प्रकार बायकांना सोसावा लागतोय.
यांच्या हातात टूथब्रश आणून देणे, यांच्या आंघोळी आगोदर बाथरूम मध्ये टॉवेल ठेवणे, यांनी चहा पिऊन झाला की आहे तिथे कप सोडून जाणे, यांना कूकर मध्ये शिजलेल्या भाताला चव लागत नाही तर मिक्सर मध्ये वाटलेली चटणी बेचव लागते, दुपारच्यावेळचे राहिलेले अन्न रात्रीच्या जेवणात चालवून न घेणे टाकून देववत नाही म्हणून पुन्हा ते शेवटच्या पंगतीला बसणाऱ्या बाईने ते तिच्या पानात घ्यावे, वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या कपड्यांची यांना अलर्जी !
तर अवेळी आलेल्या आगंतुक  पाहुण्यांसाठी करावा लागणारा पाहुणचार, आदरतिथ्य, सरबराई ही घरातल्या बाई एकटीच जबाबदारी व घरातले पुरुष आलेल्या पाहुण्यां सोबत गप्पा-टप्पा, माझा - मस्ती करायला मोकळे !!
घरात जेवणाच्या टेबलावर गलिच्छ बेदरकारपणे जेवणारा नवरा हॉटेल मध्ये जेवताना मात्र व्यवस्थित जेवतोय याची गमतीत घेतलेली नोंद यांचे इगो दुखावनार!!!

रोजच्यारोज आठवण करून देऊनही तुंबलेल्या सिंकच्या
दुरुस्तीला  प्राधान्य न देणाऱ्याना या सगळ्यात घरातल्या बाईची नेमकी काय अवस्था होतेय त्याबाबतीत हे घरातून रोज बाहेर पडणारे सगळे अगदीच अनभिज्ञ..कसली ती दाखल नाही, जाणीव नाही की सहानुभूती नाही.

बायकांच्या मासिकपाळीच्यावेळी आणि व्रतं वैकल्यावेळीची
शास्त्र अजूनच गजब !

किचन ते डायनिंग टेबल एवढ्याच रिंगणात घिरट्या घालता घालता एकदिवस जेव्हा डान्स टीचर होण्याची इच्छा ती बोलून दाखवते तेव्हा तसे करण्यासाठी कुठलेच ठोस कारण न देता तिला विरोध दर्शवताना घरातली पुरूष मंडळी गडबडतात.

ती प्रत्येक जेवणानंतर घरातल्या व्यक्तींनी टेबलावर टाकलेले खरकटे फडक्याने पुसत असते
आणि तितक्याच वेळेला  तुंबलेल्या सिंक मधे हात घालून
सिंक स्वच्छ करत असते हे बघायला किळसवाण तर वाटतच पण कंटाळा ही येतो.
सिनेमा मनाला भिडण्याचे कारण ही तेच आहे.
हा किचनमधला तोचतोचणा कंटाळवाणा आहे आणि तो अतिशय सोयीस्करित्या समाजव्यवस्थेने व कुटुंबव्यवस्थेने स्त्रियांच्या माथी मारलेला आहे कधी मातृत्वाच्या नावाखाली कधी सहाचर्याच्या नावाखाली कधी प्रेमाच्या नावाखाली.

दिग्दर्शकाने असे अनेक कंगोरे अतिशय सटीकपणे टिपले असले तरी एखादे लहान मुल व आजारपण दाखवले असते तर The Great Indian kitchen  अजूनच पूर्णत्वा कडे गेला असता.

तुंबलेल्या सिंक मधले गढूळपाणी ती चहाच्या कपात भरते आणि तुंबून टिपकणाऱ्या पाण्याची भरलेली बादली त्यांच्या आंगवर फेकून तडक माहेरीनिघून जाते.
माहेरी पोहचल्यावर संताप, क्रोध , तीटकार्याने भरलेल्या तिच्यावर आईच्या प्रश्नांची सरबत्तीसुरूच असते एवढ्यात तिचा बाहेरून आलेला भाऊ रोजच्या सवयीने आईकडे ग्लासभर पाणी मागतो.आई लहान बहिणीला भावाला पाणी द्यायला सांगते तेव्हा ज्या संतापाने ती लहान बहिणीला,” तू जगाची उठू नको” अशी तंबी देते व भावाला तितक्याच तुच्छतेने जळफळाटाने “तुला हाताने घ्यायला येत नाही का ?” म्हणून टेबलावरचा ग्लास रागाने भिरकावून देते. हा प्रसंग घारोघरीच्या सत्य परिस्थितीचा आरसा आहे.
तिथेच सिनेमा मना सोबतच डोक्यातही खोलवर रुतून बसतो.
सिनेमात सुरवातीला दाखवलेल्या गाडीत बसून ती डान्स स्कूलला पोहचते खरी मात्र दुसऱ्या कोणीतरी किचन मधली तिची जागा पटकावलेली असते. किचन मधली ही श्रुखंला त्याच पुनरावृत्तीने चालू राहते.

स्वयंपाकघर खुद्द,निमिशा सजयान,सूरज वेंजारमूडू हीच मुख्यपात्र आहेत तर सहकलाकार टी सुरेश,अपर्णा शिवकामी यांचा अभिनय ही तितकाच सहसुलभ.
सिनेमाच्या शेवटी एक अर्थपूर्ण गाणं.

घरात खडाजंगी होणार या तयारीने घरातले मुलगे मंडळीना सोबत घेवून हा सिनेमा बघण्यात खरी मजा आहे!!!

महामारीची साखळी तोडायला लॉकडाऊनचा  मोठा पर्याय आपण आमालात आणतो आहोत. Indian Kitchen मधली ही पुरुषी मानसिकता, वर्तन, अहंकाराची साखळी तोडायला कुठलं आणि कसलं लॉकडाऊन आणावं लागेल ???

 -सुलभा जाधव 

 

रविवार, १० जानेवारी, २०२१

छप्पन भोग

*छप्पन भोग*



२००९-१० मध्ये मी ओडीशा राज्यांत वास्तव्या साठी आले.आजचे ओडीशा आणि दहा वर्षापुर्वीचे ओडीशा यात जमीनआसमानाचे अंतर आहे. नवीन ठिकाण बघणे, नवीन ठिकाणी रहायला जाणे तिथल्या गोष्टी नव्या नजरेने बघणे, शिकणेयाची मला मुळातच आवड असल्याने व खाण्यापिण्यातचेही फारसे सोपस्कार नसल्यामुळे इथे जुळवून घेणे फारसे अवघड गेले नाही. 

आगळ्यावेगळ्या प्रातांत जावून पुढची बरीच वर्ष रहायचे म्हटल्यावर मनाची तयारी झालीच होती. ओघाने  येणारे बदल व अडचणी गृहित धरल्यामुळे पश्चिम भारतातून पूर्व भारतात स्थिरावत असताना हवामान सोडलं तर बाकी गोष्टीं सोबत मजेत जुळवून घेत होतो.(हवामानाशी जुळवून घ्यायला खरच खूप त्रास झाला.)


नवनवीन गोष्टी बघायला मिळत होत्या. इकडे स्थिरावत असताना बऱ्याच गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या त्यात विशेष करूनइथल्या खाद्य संस्कृतीने लक्ष वेधून घेतले. ४८५ किमी. एवढा विस्तीर्ण समुद्र किनारा या राज्याला लाभलेला आहे. आंध्र प्रदेश,पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, बिहार या राज्यांशी जोडलेल्या सीमा, भात हे मुख्य मुख्य पीक, ६७८० स्क्वे.किमी. इतके घनदाट जंगल त्यात राहणारे ६२ आदिवासी जमाती त्यात १३ PVTGs, अशा अनेक घटकांची छाप इथल्या खाद्यसंस्कृतीत दिसून येते.

मानवाच्या आवडीनिवडीचा प्रभाव त्यांच्या श्रद्धा स्थानांवर, देव-दैवतांच्या पूजार्चांवर वर दिसून येतो.ओडिशाला प्राचीनमंदिरांचा एक वैभवशाली इतिहास आहे. इथल्या मंदिरातील देव-देवतांना दररोज जो नैवेद्य दाखवला जातो त्याला भोग असे म्हणतात. इथल्या प्रत्येक मंदिराच्या भोग ची विशिष्ट अशी चव आणि खासियत आहे. पुरीच्या महाप्रभू जगन्नाथानां तर दररोज न चुकता शब्दश: छप्पन पदार्थांचा भोग चढवला जातो. हा छप्पन भोगाचा नैवेद्य देवाला चाखवल्या नंतर भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

महाप्रभूचां मुदपाकखाना आणि भक्तानां वाटण्यात येणारा हा छप्पन भोगाचा महाप्रसाद ही मोठी उलाढाल तर आहेचसोबत यात मंदीरांचे अर्थकारणही गुंतलेले आहे.

आज मी तुम्हाला पुरीच्या महाप्रभू जगन्नाथांच्या छप्पन भोगाची ची गोष्ट सांगते.

प्रभू जगन्नाथ हे विष्णूचे रूप समजले जाते. पुराणांमध्ये अशी एक कथा सांगितली जाते की,

पावसाची इंद्र देवता जेव्हा गोकूळावर कोपली  व इंद्रदेवतेने केलेल्या अतिवृष्टीमुळे गोकुळ अक्षरशः पाण्यात बुडू लागतेतेव्हा श्रीकृष्ण आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतात आणि गोकुळतली सर्व जीवसृष्टी गोवर्धन पर्वताखालीआश्रयासाठी गोळा होते.ज्या श्रीकृष्णाला दिवसाकाठी आठ वेळा जेवायची सवय असते ते श्रीकृष्ण सात दिवसअन्नपाण्याविना गोवर्धन पर्वत करंगळीवर घेऊन उभे असतात. सातव्या दिवशी इंद्राचा रुद्रावतार शांत होतो व गोकुळावर कोसळणारा मुसळधार पाऊस थांबतो. तेव्हा समस्त गावकरी आनंदाने नाचू-गाऊ लागतात व त्याच आनंदाच्या भरात श्रीकृष्णासाठी सात दिवसांचे आठ ह्या हिशोबाने छप्पन पदार्थ शिजवून जेवू घालतात. तर अशी ही छप्पन भोगाची गोष्ट!

हिंदू धर्मात चारधामांचे महत्त्व आहे या चारधामांशी निगडित एक अख्यायिका सांगितली जाते ती अशी, भगवान विष्णू रामेश्वरमला स्नान करतात, जगन्नाथ पुरीला अन्नग्रहण करतात, बद्रीनाथला ध्यान करायला बसतात आणि द्वारकेला जाऊन झोपतात. या तर्कानुसार ही पुरी या तीर्थक्षेत्री अमळ अन्न शिजत असते यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही. तरीच इथले लोक अभिमानाने सांगत असतात जगन्नाथ पुरीत तुम्हाला उपाशी माणूस भेटणार नाही.

देवाला दिवसाला सहा वेळात विभागून छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवण्याचे एक वेळापत्र आहे.

१.सकाळी साडेआठच्या दरम्यान गोपाळ वल्लभ भोग.

२.सकाळी दहाच्या वेळी सकाळचे धूप भोग.

३.सकाळी आकरा वाजता भोग मंडप भोग

४.दुपारी साडेबारा ते एक वाजता माध्यान्ह धूप भोग.

५.सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान संध्या धूप भोग.

६.बड़ा श्रृंगारा भोग रात्री आकरा वाजता. त्यानंतर महाप्रभू जगन्नाथ निद्रस्त होतात.


प्रभु जगन्नाथाच्या प्रसादासाठी स्वतंत्र असे मंदिराचे स्वयंपाक घर आहे.त्याचा सगळा स्वयंपाक रांधण्याचे एक शास्त्र आहे. विशिष्ट असे नीतिनियम पाळून हा सगळा स्वयंपाक रांधण्यात येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नैवैद्यात कांदा लसुन याचा वापर करत नाहीत.महाप्रभूंच्या प्रसादाचा स्वयंपाक रांधत असताना त्या पदार्थांमध्ये मन जावू नये त्याचा सुवास घेणं म्हणजे सुद्धा अन्न उष्टावणे या धारणेने स्वयंपाकी त्याच्या नाकावर पंचा बांधतात तो नैवेद्य महाप्रभूनां दाखवताना पंडा (पूजारी) सुद्धा नाकाला पंचा बांधून नैवेद्य दाखवत असतो! 


तर हे छप्पन पदार्थ कुठले?

तांदळा पासून बनलेले पदार्थ

१. अन्न-  पाण्यात शिजवलेला साधा भात

२. कनिका - गण्याचा गुरगुट्या भात, तूप आणि साखर

३.दही पाखाल - पाण्यात घालून ठेवलेला भात त्यात दही

४.थाली खिचडी - शक्यतो मुगाच्या डाळीची तूप घालून केलेली खिचडी 

५. आदा पखाल-शिजवलेला साधा भात

त्यात अद्रक आणि पाणी.

६. घीय अन्न- तुपात शिजवलेला भात मिसळा

७. खिचडी - साधी नेहमीची खिचडी

८. मिठा पखाल  - शिजलेला भात साखर आणि पाणी

९. ओडिया पखाल - शिजलेला पाणी भात, तूप, लिंबू आणि मीठ 

डाळीची आमटी आणि भाज्या

१०.डालामा 

११.बेरी डाली

१२.मुग डाली

१३. उडद दाली

१४. डाली

१५. साग

१६.रायता

१७.बैंगनी

१८. दही बैंगन 

१९.खट्टा 

२०.महूर

२१.पित्ता 

२२. पटोल रस

२३. बेसर

दुधापासून बनवलेले पदार्थ

२४.खीरी - 

२५.पापुडी -

२६.खुआ -

२७.रसाबाली - 

२८.तडिया - 

२९.छेना खाई - 

३०.बापूडी खजा -

३१.खुआ मंडा - 

३२.सारपुल्ली - 

पिठा आणि मंडा

(छेना म्हणजे पनीर, ओले खोबरे, गव्हाचे पीठ/ रवा/ मैदा, साखरेचा पाक यापासून बनवलेले गोड पदार्थ)

३३. सुर पीठा - 

३४. चडाई लाडा -

३५.झिल्ली - 

३६.कांती - 

३७.मंडा-

३८.अमळू -

३९.पुरी -

४०.लूची - 

४१.दही बारा - 

४२.बारा -

४३.अरीसा - 

४४.त्रिपुरी-

४५.रोसापाईक - 

४६.खाजा -

४७.गाजा - 

४८.लाडू - 

४९.जीरा लडू

५०.मगजा लडू

५१.माथापुली - 

५२.खुरुमा - 

५३.जगन्नाथ बल्लाव -

५४.काकरा - 

५५.लूनी खुरुमा - 

५६.मारीची लाडू - 

तुम्हाला प्रश्न पडला असेल या यादीत उडिया जनमानसाचा प्राणप्रिय रशगुल्ला कसा नाही.

जग्गनाथ महाप्रभु रसगुल्ला खात नाहीत का?

खातात ना ! एका अतिविशिष्ट प्रसंगी ते रसगुल्ला नैवैद्य म्हणून प्राशन करतात.

तर या नैवैद्य रशगुल्ल्याची एक मजेशीर गोष्ट आहे, ती पुढच्या भागात.


 क्रमशः

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

कांचीवरम

 
  घरात घट बसवणे, त्याचे होईस्तोवर सोपस्कार माझ्यावरच येणार हे गृहीत आहे. ‘तितली’ ने बागेत एकही फूल ठेवलेलं नाही. केवढा विरोधाभास.
मग घटाला माळ कशाची घालायची? या नवीन वाढून ठेवलेल्या प्रश्नांशी रोज दोन हात करावे लागत आहेत.

आज dry fruits ची माळ घालावी असे ठरवून ९ बदाम जवळ घेवून बसले.एक-एक बदाम गाठीत गुंफताना ना असा काय जीव कासावीस होत होता काय सांगू! साध्या गाठीच तर मारायच्या होत्या पण अशी दमछाक झाली.. या ९बदाम आणि ९ गाठीनीं नाकी नऊ आणले.

विणणं काय आणि गुंफणं काय कमालीची चिकाटी हवी त्याला, येड्या गबाळ्याचे काम नोहे !

कांचीवरम साडी
-कांचीवरम , तमिळनाडू.
     
कांचीवरम साड्या दक्षिण भारतातील कांचीपुरम शहरात,(तमिळनाडू)विणल्या जातात.
हिंदू पौराणिक कथांनुसार, कांचीवरम साड्यांचे विणकर महर्षि मार्कंडेयांचे वंशज मानले जातात. ते कमळाच्या देठांतून मिळवलेल्या तंतूंपासून देवतांसाठी वस्त्रं विणायचे. काही ऐतिहासिक तथ्यांनुसार, कृष्णदेवरायाच्या काळापासून कांचीवरम कापड/साड्यानां तिच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी जगभर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.
‘कांचीपुरम’ हे रेशमी साड्यांचे मुख्य उत्पादन केंद्र असल्यामुळे ते  ‘रेशीम शहर’ म्हणूनही ओळखले जाते.

कांचीवरम साडीची दखल भारत सरकारने घेतल्यावर तिला २००५-६ मध्ये भौगोलिक संकेतक (Geographical Indicator) चे स्थान मिळाले.

कांजीवरम साडीच्या निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे मलबारी रेशीम वापरले जाते. कांचीवरम रेशीम साडी ज्या प्रकारे विणली जाते ज्याला कोरवई पद्धत असेही म्हटले जाते. यात तीन धाग्याच्या गुंड्या (दोऱ्याचा रीळ) वापरल्या जातात. एकजण उजव्या बाजूस काम करत असतो तर त्याचा सहकारी डाव्या बाजूला दुसरी गुंडी घेवून विणायला मदत करतो. तिसरी गुंडी पदरासाठी असते.
या पद्धतीत साड्यांचे काठ आणि पदर सारख्याच रंगाचे असतात तर साडीचा तागा वेगळ्या रंगांचा. काठ आणि पदर सामान्यतः साडीच्या ताग्यापेक्षा बरेच भिन्न असतात.
स्वतंत्रपणे विणलेला पदर,काठ आणि साडीचा तागा या तिघांना शेवटी सौम्यपणे एकत्र सामील करत गुंफणं हे मोठे कलाकुसरीचे काम !
कांचीवरम साडीची रुंदी इतर रेशमी साडीपेक्षा जास्त असते सामान्य साडीची रुंदी 45 इंच असेल तर कांचीवरम साडीची रुंदी 48 इंच असते. या साड्यांचे रंगही लगेच डोळ्यात भरणारे चमकदार गडद व भडक असतात.
कांचीवरम साडीच्या विणकामात फक्त जर, शुद्ध चांदीची जर वा सोन्याच्या पातळ तारा यांचा वापर असतोच. सूर्य, चंद्र, मोर, हंस, रथ ,कोयरी आणि मंदिराचे नमुने यांत वापरले जातात. राजा रवीवर्मानीं काढलेली महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये दर्शविणारी चित्रं पदरांवर विणली गेली आहेत.

एक साडी विणण्यासाठी  ३ विणकरांचा १०ते २०दिवस इतका वेळ लागतो.कौशल्य  आणि मानवी मेहनत यामुळे कांचीपुरम  रेशमी साडी ची किंमत ५ हजारांपासून  सुरू होते आणि वाढते ती लाखोंपर्यत !

२००८ मध्ये प्रर्दशित झालेल्या “कांचीवरम “या तमिळ सिनेमात कांचीपुरम येथील रेशीम विणकरांचे संघर्ष आणि शोषण प्रभावीपणे दर्शविले आहे.

लेहंगा,चनियाचोळी, घागरा यांचे चलन असताना आजही दक्षिण भारतीय मुलगी कांचीवरम न नेसता लग्नाच्या मांडवात उभी राहणे निव्वळ अशक्य. एकच कांचीवरम साडी तीन-चार पिढ्यांत चालत आलेली कितीतरी उदाहरणं आहेत आणि असा ठेवा/ वारसा जोपासणाऱ्या नव्या पिढ्या सुद्धा !

-सुलभा निपाणीक-जाधव